मुंबई - पोलीस म्हटले की नेहमीच आपल्या मनात याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह असतात. बरेच जणांची तर पोलिसांसंदर्भात चांगली प्रतिक्रिया नसते. मात्र, अहोरात्र लोकांच्या सेवेमध्ये असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलने पुन्हा एकदा मुंबई पोलिसांची मान उंचावली आहे. चुनाभट्टी येथील एका विद्यार्थिनीचा बारावीचा शेवटचा पेपर आणि तिने शाळेकडे जाणारी बस चुकीची पकडल्याने तिच्या जीवनात सर्वात महत्त्वाची असणारी परीक्षा देण्याला ती मुकणार होती. तेवढ्यात त्या सर्कलवर तैनात असलेल्या वाहतूक पोलीस कॉन्स्टेबलने विद्यार्थिनीच्या मदतीला धावून तिला परीक्षा केंद्रापर्यंत सोडून दिले. त्यामुळे, विद्यार्थिनीला आपला पेपर देता आला.
हेही वाचा - Fit Maharashtra : नियमित व्यायाम करा, तरच निरोगी महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईल - उपमुख्यमंत्री अजित पवार
विद्यार्थिनी अल्पिता वनगे ही चुनाभट्टी परिसरात राहते ती रोज चेंबूर नाका परिसरात महात्मा फुले कॉलेज या परीक्षा केंद्रात परीक्षा देण्याकरिता रोजप्रमाणे मंगळवारी बारावीचा हिंदीचा शेवटचा पेपर देण्याकरिता घराबाहेर पडली होती. मात्र, चुकून दुसरी बस पकडली. थोडे पुढे गेल्यानंतर तिला लक्षात आले की, आपण चुकीच्या मार्गावर जाणारी बस पकडली आहे. हे लक्षात येताच तिने आईला फोन करून सांगितले. आईने बसमधून उतरण्यास सांगितले.
अल्पिता सुमन नगर जंक्शन येथे उतरली. तिला काय करायचे कळे ना? परीक्षेचा वेळ देखील जवळ येत होता. तिच्या डोळ्यात अश्रू यायला सुरू झाले होते तेवढ्यात बाजूला ड्युटीवर असलेले वाहतूक कॉन्स्टेबल सुरेश पवार यांचे त्या मुलीवर लक्ष गेले आणि ते त्या मुलीकडे गेले आणि तिला विचारपूस. तेव्हा मुलीने सांगितले की माझा आज शेवटचा पेपर आहे आणि मी चुकीची बस पकडल्याने मी इथपर्यंत आले. त्यावेळी काही मिनिटांचा देखील विलंब न लावता कॉन्स्टेबल सुरेश पवार यांनी त्या मुलीला तिच्या परीक्षा केंद्रावर सोडून दिले. त्यामुळे विद्यार्थिनीला आपला बारावीचा शेवटचा पेपर देता आला.
यासंदर्भात सुरेश पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी म्हटले की, नेहमीप्रमाणे मी सुमन नगर जंक्शन सिग्नलला ड्युटीला उभा होतो. त्या ठिकाणी एक विद्यार्थिनी गोंधळलेल्या अवस्थेत उभी होती आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू देखील येत होते. मी तिच्या जवळ जावून तिला विचारले तेव्हा तिने मला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर मी तिला सांगितले भिऊ नको मी तुला तुझ्या शाळेपर्यंत सोडून देतो आणि माझ्या वाहनाने मी तिला परीक्षा केंद्रापर्यंत घेऊन गेलो. मात्र, त्यावेळी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात येण्याची वेळ संपली होती.
त्या ठिकाणी तिला परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यास नाकार सुद्धा देण्यात आला होता. मात्र, मी परीक्षा केंद्रातील शिक्षकांना विनंती केली की, ही मुलगी तिचा रस्ता चुकली होती म्हणून तिला परीक्षा केंद्रावर यायला उशीर झाला. त्यानंतर परीक्षा केंद्रावरील शिक्षकांनी विद्यार्थिनीला प्रवेश दिला आणि तिचा शेवटचा पेपर हा तिला सोडवता आला, अशी प्रतिक्रिया सुरेश पवार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
हेही वाचा - INS Vikrant fund case: विक्रांतप्रकरणी सोमैया पिता - पुत्रावर गुन्हा दाखल, माजी सैनिकाने केली तक्रार