मुंबई - शहरात कोरोनाचा प्रसार होत असतानाच महापालिका आणि पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात लागण होत आहे. पालिकेच्या मालमत्तेची सुरक्षा करणाऱ्या 171 सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत 09 सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला आहे. एक सुरक्षा अधिकारी व 76 सुरक्षा रक्षक विविध रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती पालिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईत मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. तेव्हापासून पालिकेची आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. आरोग्य यंत्रणेसह पालिकेच्या प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचारी कोरोना विरोधात लढा देत आहेत. या लढ्यात पालिका मुख्यालय, विभाग कार्यालय, पाणी पुरवठा करणारी धरणं, हॉस्पिटल आदींची सुरक्षा करणाऱ्या सुरक्षा अधिकारी व रक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे.
पालिका मुख्यालयासह पालिकेच्या मालमत्तेचे रक्षण करणाऱ्या सुरक्षा विभागातील १७१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात ८ अधिकारी तर १६३ सुरक्षा रक्षक आहेत. यापैकी ९ सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला आहे. १ अधिकारी ७६ सुरक्षा रक्षक विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. आतापर्यंत ६ अधिकारी व ३० सुरक्षा रक्षकांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या १ अधिकारी व ४८ सुरक्षा रक्षक होम क्वारंटाइन असल्याची माहिती पालिकेच्या सुरक्षा विभागातील अधिकाऱ्याने दिली.
मुंबई महापालिकेच्या आरोग्य, सफाई, सुरक्षा, पाणी आदी विविध विभागातील २२०० हुन अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून १०८ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
बाधित सुरक्षा अधिकारी व रक्षकांची संख्या
अधिकारी - 08
सुरक्षा रक्षक - 163
एकूण - 171
होम क्वारंटाइन
अधिकारी - 01
सुरक्षा रक्षक -48
उपचारार्थ दाखल
अधिकारी - 01
सुरक्षा रक्षक - 76
कोरोनावर मात
अधिकारी - 06
सुरक्षा रक्षक - 30
मृत्यू सुरक्षा रक्षक - 09