मुंबई - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या ब्रिटीशकालीन असून त्या बदलण्याचे काम पालिकेच्या जल विभागातर्फे हाती घेण्यात येत आहे. भांडूप संकुल उदंचन केंद्रात १२०० मिलिमिटर व्यासाची बटर फ्लाय झडप आणि ७०० मिलीमीटर व्यासाची बटरफ्लाय झडप बदलण्याचे काम आज होणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे काम हाती घेण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कालावधीत मुंबई शहराच्या पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येणार असल्याचे जल विभागातर्फे सांगण्यात आले.
हेही वाचा - शिवसेनेच्या आमदारांना घरी जाण्याचे आदेश, ६ दिवसांपासून होते हॉटेल रिट्रीटमध्ये
तानसा, तुळशी, मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, तानसा व भातसा या सात धरणातून मुंबईला दररोज ३,८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या १०० ते १५० वर्ष जुन्या झाल्याने पाणी गळती रोखण्यासाठी जलवाहिन्या बदलण्याचे काम जल विभागातर्फे हाती घेण्यात येते. भाडुंप संकुलातून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या जुन्या झाल्या असून त्या बदलण्याबरोबर झडपा बदलण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मुंबईकरांनी पाण्याचा पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा असे देखील आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा - अमेरिकेच्या बंदीनंतरही हुवाईची चांगली कामगिरी; कर्मचाऱ्यांना देणार २०४४ कोटींचा बोनस