मुंबई - कोरोना व्हायरसचा विळखा संपूर्ण जगात पसरत आहे. अशात तोंडाला लावण्यात येणाऱ्या मास्कची मागणी परदेशातून वाढत आहे. याचाच फायदा उचलत मुंबईतील एका उद्योजक महिलेला तब्बल 4 लाख रुपयांना गंडवणाऱया आरोपीला मुंबई पोलिसांच्या वडाळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मुंबईतील वडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भक्तीपार्क येथे राहणाऱ्या नम्रता नाविनचंद्र मनोचा या महिला उद्योजकाचा सद्गगुरू इम्पेक्स या नावाने कामगारांचा गणवेश बनवून तो परदेशात निर्यात करण्याचा व्यवसाय आहे. 28 फेब्रुवारीला पीडित तक्रारदार महिलेच्या या कंपनीकडे फ्रांस, ओमान या देशांमधून तोंडाला लावण्यात येणाऱ्या मास्कची मागणी करणारी ऑर्डर आली होती. यावेळी नम्रता यांनी या संदर्भात इंटरनेटवरील इंडिया मार्ट या संकेतस्थळावर जाऊन चौकशी केली असता, त्यांना भक्ती इंटरप्रायजेस, भुवनेश्वर, ओडिसा या कंपनीची मास्क संदर्भातील जाहिरात पाहायला मिळाली.
या संदर्भात त्यांनी कंपनीचा मालक बोदले अब्रार मुस्ताक या आरोपीशी मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून सदर त्याच्याकडून मास्कचे फोटो, व्हिडिओ, जीएसटी क्रमांक व आयएसओ प्रमाणपत्राची मागणी केली. आरोपीने याबद्दल माहिती दिल्यावर तक्रारदार व आरोपी यांच्यात 14 लाख 40 हजार रुपयांच्या 1 लाख 60 हजार मास्कचा व्यवहार ठरवण्यात आला होता.
5 मार्चला या संदर्भात नम्रता यांनी आरोपीच्या डीबीएस बँक खात्यात मोबाईल अॅपच्या माध्यमातून 4 लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. मात्र, ठरवण्यात आलेल्या वेळेस मास्कचा पुरवठा न झाल्याने नम्रता यांनी आरोपीच्या कंपनीबद्दल चौकशी केली. यावेळी सदरची कंपनी व त्याचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे लक्षात आले. यानंतर पीडितेने या संदर्भात वडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तांत्रिक तपास करत आरोपीला मुंबईतील जेजे मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला 18 मार्चपर्यंत पोलीस कोठडि सुनावली आहे.
हेही वाचा -
Corona Effect VIDEO: संत्र्यांच्या मागणीतील वाढ व्यापाऱ्यांच्या पथ्यावर?
CORONA : विघ्नहर्त्यावर कोरोनाचे सावट; सिद्धीविनायक मंदिर दर्शनासाठी बंद