नागपूर - दरवर्षी 10 एप्रिल या दिवशी होमिओपॅथी उपचार पद्धतीचे जनक म्हणून डॉ. क्रिस्टीएन फ्रेडरिक सॅम्युअल हॅनिमेन यांचा जन्मदिवस ‘जागतिक होमिओपॅथी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. पूर्वी होमिओपॅथीचा उपयोग हा सर्दी, खोकला, ताप या आजारांच्या उपचारासाठी व्हायचा. पण, मागील काही काळात भारतात अनेक संशोधनानंतर लोकांचा कल होमिओपॅथी उपचार पद्धतीकडे वाढत आहे. विशेषत: कोविडच्या लाटेमध्ये कोरोना रुग्ण बरे करण्यास ही पद्धती कारणीभूत ठरल्याचा दावा मागील 16 वर्षांपासून सेवा देत असलेल्या डॉ. अश्विनी आंबटकर ( Dr Ashwini Ambatkar talk on homeopathy ) यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला. जाणून घेऊ दुर्धर आजारावर कसा होतो उपचार या विशेष वृत्तातून.
हेही वाचा - अमोल मिटकरींनी नागपूर कनेक्शनचे पुरावे द्यावे, अन्यथा चौकशीला समोर जावे - भाजप नेते धर्मपाल मेश्राम
होमिओपॅथीचा उपचार रुग्णाच्या भावना आणि पूर्वइतिहासाचा अभ्यास करून केला जातो. डॉ. अश्विनी सांगतात, आज अनेक रुग्णांमध्ये किडनी स्टोन हा आजार वाढतोय. यातील बहुतांश रुग्णांच्या हिस्ट्रीमध्ये राग व्यक्त न करू शकल्याने शरीरात झालेल्या बदलामुळे त्या आजाराची लागण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोना काळात जिथे रुग्णालयात बेड उपलब्ध होत नव्हते, त्या ठिकाणी योग्य पद्धतीने शेकडो रुग्णांचा त्रास समजून आणि काउन्सिलिंग करून त्यानंतर औषध उपचार करून रुग्ण बरे झाले असल्याचेही डॉ. अश्विनी आंबटकर यांनी सांगितले. कोरोनामुळे जिकडे तिकडे भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. होमिओपॅथीतून भीती घालवत भावना समजून घेत रुग्णांना दिलासा देण्यात आला, असेही आंबटकर यांनी सांगितले.
आजच्या घडीला अनेक दुर्धर आजार, व्याधींनी ग्रस्त लोकांना जिथे इतर पॅथीमध्ये शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो, तेच होमिओपॅथीमध्ये त्या आजाराचे मूळ कारण शोधले जाते. आजच्या घडीला दैनंदिन जीवनात नैराश्य, अनिद्रा, आर्थिक ताण तणाव, या सर्व बाबी समजून उपचार केले जाते. त्यानंतर आजराचे मुळ समजले की मग उपचार सुरू होतो. यातच कॅन्सर, मधुमेह, यासारख्या आजारांवर सुद्धा यशस्वी उपचार झाल्याचा दावा डॉ. अश्विनी आंबटकर यांनी केला.
गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात जाऊन वैद्यकीय कॅम्प लावून तेथील रुग्णांवर होमिओपॅथी उपचार करण्याचेही काम डॉ. अश्विनी करतात. साई आस्था फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत उपचार, आदिवासी मुलांना, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून आपली सामाजिक बांधिलकी त्या जपत असतात. मागील पाच ते सहा वर्षांपासून नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या पोलिसांबरोबर रक्षाबंधन, भाऊबीज उत्सव साजरा करण्याचे कार्य त्या करतात. कोरोना काळात तिन्ही लाटेत, दिवस रात्र काम करणाऱ्या पोलीस बांधवांवर एकही रुपया न घेता उपचार त्यांनी केला आहे.