कोल्हापूर - हिवाळा किंवा पावसाळा जवळ आला की प्रत्येकजण स्वेटर, रेनकोट खरेदीसाठी बाहेर पडत असतात. यावेळी सर्वात पहिला सर्वांची पावले वळतात, ती कोल्हापुरातल्या दसरा चौकातील नेपाळी लोकांच्या स्टॉलकडे. गेल्या 35 वर्षांहून अधिक हे सर्व विक्रेते कोल्हापुरात व्यवसायासाठी आले आणि इथलेच बनून गेले आहेत. सध्या या ठिकाणी दुसरी पिढी व्यवसाय चालवत असून त्यांची मुलेसुद्धा कोल्हापुरातच शिक्षण घेत आहेत. कसा सुरू आहेत यांचा व्यवसाय आणि कशा प्रकारे त्यांनी आपला व्यवसाय सुरू ठेवला आहे, यासंदर्भातील एक रिपोर्ट...
हिवाळ्यात स्वेटर आणि पावसाळ्यात रेनकोट विक्रीचा व्यवसाय
कोल्हापूरातल्या ऐतिहासिक दसरा चौकात सीपीआर हॉस्पिटलच्या भिंतीला लागून असलेले नेपाळी लोकांचे स्वेटर आणि रेनकोटचे स्टॉल प्रत्येकालाच माहीत आहेत. गेल्या 35 वर्षांपासून ते या ठिकाणी व्यवसाय करत आले आहेत. हिवाळ्यात उबदार कपड्यांची ते विक्री करत असतात तर पावसाळ्यात विविध प्रकारच्या रेनकोटची विक्री करत असतात.
असंख्य व्हरायटी आणि प्रचंड गर्दी
स्वेटर किंवा रेनकोट घ्यायचा झाला की अनेकांची पहिली पसंत दसरा चौकातील नेपाळी लोकांच्या स्टॉललाच असते. सिझननुसार मोठ्या प्रमाणात स्वेटर आणि रेनकोटची यांच्याकडे व्हरायटी असते. अगदी 100-150 रुपयांपासून 2 हजारांपर्यंत विविध प्रकारचे रेनकोट आणि स्वेटर याठिकाणी आपल्याला मिळू शकतात. त्यामुळे अनेकजण याठिकाणी खरेदीसाठी येत असतात. दररोज सायंकाळी तर प्रचंड गर्दी याठिकाणी पाहायला मिळत असते. शहरात नोकरीनिमित्त आलेले खेडेगावातील लोकही गाड्या थांबवून यांच्याकडून खरेदी करून जाताना पाहायला मिळते.
आई वडिलांचा व्यवसाय मुलेही नेत आहेत पुढे
गेल्या 30-35 पूर्वी कोल्हापुरातील आलेल्या नेपाळी व्यवसायिकांच्या मुलांनीसुद्धा त्यांचा व्यवसाय तसाच पुढे सुरू ठेवला आहे. शिवाय कोल्हापुरातील लोकसुद्धा आपल्याकडूनच मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्याने ते सुद्धा या ठिकाणीच रमले असल्याचे येथील व्यावसायिक टेनझिन यांनी म्हटले आहे.
30 कुटुंबे आणि त्यांची मुलेसुद्धा या ठिकाणीच घेत आहेत शिक्षण
या व्यवसायासाठी नेपाळी लोकांची कोल्हापुरात तब्बल 30 कुटुंबे आली आहेत. दसरा चौक परिसरातच ते वास्तव्यास आहेत. विशेष म्हणजे या सर्वच व्यावसायिकांची मुलेसुद्धा आता कोल्हापुरातल्या विविध शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. ते सुद्धा या ठिकाणी कोल्हापुरी मुलांसोबत रमले आहेत.
8 महिने व्यवसाय, 4 महिने गावाकडे
हे सर्व नेपाळी व्यावसायिक पावसाळा आणि हिवाळा असे एकूण 8 महिने कोल्हापुरात व्यवसाय करत असतात. त्यानंतर ते आपापल्या गावी जातात. विशेष म्हणजे सुट्टीतील 2 महिने नवीन माल खरेदी करण्यासाठीच जात असतात, असे येथील विक्रेते टेनझिन यांनी म्हटले आहे. भारतासह आपल्या देशातील विविध ठिकाणांहून ते माल खरेदी करत असतात. ग्राहकांना जास्तीत जास्त व्हरायटी देण्यासाठी एकाच ठिकाणी खरेदी न करता विविध ठिकाणांहून ते माल खरेदी करत असतात.
कोरोनाचा व्यवसायावर परिणाम
कोरोनामुळे सध्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. तब्बल 50 टक्क्यांहून अधिक विक्रीमध्ये घट झाली असल्याचे व्यावसायिक टेनझिन यांनी म्हटले. नागरिकांकडेच पैसे नसल्याने विक्रीवर परिणाम झाला आहे. जेवढी विक्री होत आहे त्यावर ते समाधानी सुद्धा आहेत. लवकरच देशातून कोरोना जाईल आणि सर्व व्यवसाय पूर्ववत होतील, अशी प्रार्थना हे सर्व व्यावसायिक करत आहेत.