कोल्हापूर - रमणमळा परिसरात ऑस्ट्रेलियातून आलेला ओमायक्रॉनचा (Omycron in Kolhapur) संशयित रुग्ण सापडल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली. अशातच मंगळवारी नायजेरियातून कोल्हापुरात गेल्या आठवड्यात आलेला 52 वर्षाच्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. न्यू शाहुपूरीतील सुर्वे कॉलनी येथील संबंधित व्यक्ती असून शासनाच्या नियमावलीनुसार संबंधित व्यक्तीचा स्वॅब पुढील तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला आहे.
संबंधित व्यक्ती नायजेरियातून कोल्हापुरात न्यू शाहुपूरी येथे ख्रिसमस सुट्टी निम्मित आला असून तो नायजेरियातील खाजगी कंपनीत व्यवस्थापकीय पदावर नोकरीस आहे. कोरोना तपासणीनंतर संबंधित व्यक्ती 9 डिसेंबरला मुंबईत आली. मुंबईतही त्यांचा आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटीव्ह आला. त्यानंतर चारचाकी वाहनाने ते कोल्हापुरात आले. याठिकाणी त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले. स्वॅब घेतल्यानंतर त्याचा मंगळवारी रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सदर व्यक्तीचे अहवाल झिनोम सिक्वेन्ससिंगसाठी पुण्याच्या NIB लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. त्याचे अहवाल 2 दिवसात मिळतील. खबरदारी म्हणून त्या व्यक्तीच्या संपर्कातील 8 जणांचे स्वॅब महापालिका प्रशासनाने घेतले आहेत. सबंधित व्यक्तीने कोरोना प्रतिबंधक दोन्ही डोस घेतले असल्याचे उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी सांगितले.
आरोग्य विभाग अधिक सतर्क -
काल रमणमळा परिसरात ऑस्ट्रेलियातून कोल्हापुरात आलेला 45 वर्षीय नागरिक ओमायक्रोनचा पहिला संशयित रुग्ण आढळला यामुळे एकच खळबळ उडाली होती. अशातच लगेच दुसऱ्याच दिवशी नायजेरियातील संशयित व्यक्ती मिळाल्याने आरोग्यविभाग अधिक सतर्क झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने त्याठिकाणी औषध फवारणी केली असून बाहेरच्या देशातून आलेल्या प्रत्येक प्रवाशांवर प्रशासनाची करडी नजर आहे.