कोल्हापूर - गेल्या 12 दिवसांपासून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. उद्या या शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी या बंदला पाठिंबा द्यावा, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आवाहन केले आहे. शिवाय भारत बंद शांततेने पाळून आपली दुकानं बंद ठेवावीत, असे आवाहनसुद्धा त्यांनी केले आहे. शिवाय या आंदोलनाला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटीलसुद्धा उपस्थित होते.
मोदींनी 6 वर्षात कोणाला थारा दिला नाही; आता बैठका घेतायेत -
यावेळी पत्रकार परिषदेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गेल्या 6 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुणालाही थारा दिला नाही. पण सध्या बैठका घेत आहेत. गेले 12 दिवस 6 ते 7 इतक्या कमी तापमानात शेतकरी आंदोलन करत आहेत. थंडीत कुडकुडत हे आंदोलन करत आहेत. त्यामुळे त्यांच्या हक्कासाठी या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवावे -
शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या बंदला सर्वांनी शांततेत पाठिंबा द्यावा. शिवाय वाहतूक सेवासुद्धा बंद राहणार असल्याचे त्यांनी म्हंटले असून अत्यावश्यक सेवा वगळता काहीही सुरू ठेऊ नका अशी विनंतीसुद्धा मुश्रीफ यांनी केली.
घराच्या बाहेर काळे कापड ठेवून केंद्र सरकारचा निषेध करा -
यावेळी पत्रकार परिषदेत पालकमंत्री सतेज पाटील यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. शिवाय उद्या प्रत्येकाने आपापल्या घराबाहेर काळे कापड लावून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करावा, असे आवाहन केले. शिवाय प्रत्येकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपापले डीपी काळे लावून या सरकारचा निषेध करावा, असे सतेज पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा - '...तेव्हा बहुमताची सरकारेसुद्धा डचमळून कोसळतात व बलदंड समजले जाणारे नेतृत्व उडून जाते'
हेही वाचा - 'दिल्ली चलो' आंदोलनाचा १२वा दिवस; दररोज वाढतोय शेतकऱ्यांना देशभरातून मिळणारा पाठिंबा..