कोल्हापूर- मटण दरवाढीचा मुद्दा आता कोल्हापुरात चांगलाच तापणार असल्याचे दिसत आहे. दरवाढीच्या विरोधात एकीकडे आंदोलने सुरू आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी तर याबाबत एक समितीच स्थापन केली आहे. आंदोलक सव्वाशे रुपयांनी मटणाचा दर कमी करावा या मुद्द्यावर ठाम आहेत. तर मटण विक्रेते 540 रुपयांवर ठाम आहेत. त्यामुळे आता यामध्ये काय तोडगा निघतो हेच पाहावे लागणार आहे.
मटण दरवाढीवर तोडगा काढण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला ग्राहक समितीचे आर. के. पवार, बाबा पार्टे, बाबा इंदुलकर, सुजित चव्हाण, दुर्गेश लिंग्रस आदी उपस्थित होते. मात्र, मटण विक्रेते यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. जिल्हाधिकारी प्रशासनाने नोटीस दिली असताना, मटण विक्रेते उपस्थित का राहत नाहीत. त्यांनी 540 रुपये प्रतिकिलो मटण विक्रीचा निर्णय घेतला आहे. मात्र, 450 च्या वर एक रुपया देणार नाही. मटण विक्रेत्यांचा हट्ट खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा ग्राहक समितीने दिला.
बैठकीला उपस्थिती लावणार नसल्याने खाटीक समाजाच्या प्रतिनिधींनी आरोग्य अधिकारी दिलीप पाटील यांना बाहेर बोलवून घेतले. मटण दरवाढीबाबत सामंजस्याने तोडगा काढु असे आश्वासन दिलीप पाटील यांनी मटण विक्रेत्यांना दिले. मात्र, विक्रेते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. एक वेळ आम्ही सामुदायिक आत्महत्या करू, पण आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. मटण 540 रुपये किलोनेच आम्ही विकणार, त्या खाली एक रुपया घेणार नाही असेही विक्रेत्यांनी स्पष्ट केले.
मटण दरवाढबाबत पुन्हा १२ डिसेंबरला बैठक होणार आहे. पण विक्रेते आणि आंदोलक दोघेही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने नेमका काय तोडगा निघतो, याकडे संपूर्ण कोल्हापूरकरांचे लक्ष लागले आहे.