कोल्हापूर - शहरातील राजेंद्रनगर येथील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बल्लारीच्या जुगार अड्ड्यावर राजारामपुरी पोलिसांनी आज दुपारी छापा टाकला. याठिकाणी जुगार खेळणाऱ्या सहा महिला व तीन पुरूष अशा नऊ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडील रोख रक्कम 12 हजार रुपये, 4 मोबाईल व जुगाराचे साहित्य असा सुमारे 21 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्रनगर येथील बाळू बसवंत सकट यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती राजारामपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव, सिद्धेश्वर केदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज दुपारी या ठिकाणी छापा टाकला. येथे जुगार खेळणाऱ्या सुनिल संभाजी जाधव (वय 38, टेंबलाई नाका), योगेश दगडू भांगरे (वय 25) व संतोष कमलाकर गायकवाड (वय 27, दोघे रा. सुधाकर जोशीनगर), भिंगरी अविनाश सकट (वय 40, रा.राजेंद्रनगर), सुरेखा रामू नरंदे (वय 35, रा. टेंबलाईनाका), हेमा रविंद्र कसबेकर (वय 40, रा. राजारामपुरी 14 वी गल्ली), लता राजेश उपाळे (वय 40, रा. संभाजीनगर), पिंकी विशाल सकट (वय 50 रा . राजेंद्रनगर) व लक्ष्मी हिराचंद राख (वय 45 रा. संभाजी नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम 12 हजार 40 रूपये, चार मोबाईल हँडसेट व जुगाराचे साहित्य असा सुमारे 21 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . काही दिवसांपूर्वी राजारामपुरी पोलिसांनी अशाच महिला जुगार अड्ड्यावर छापा टाकाला होता. पुरुषांच्याबरोबरीने आता महिलाही जुगार खेळण्यात पटाईत झाल्याचे या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे.