कोल्हापूर - शेणोळी-कोणत्याही परिस्थितीत बेळगाव मध्ये भगवा ध्वज फडकल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. कर्नाटक पोलिसांनी गुंडगिरी करून शिवसेनेला रोखण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. असा इशारा शिवसेनेने दिला आहे. दरम्यान शिवसेनेचे कार्यकर्ते कर्नाटकात घुसण्याच्या तयारीत असतानाच कर्नाटक पोलीस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट उडाली. यावेळी कर्नाटक सरकारने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या वर लाठीमार केला.
सकाळी बाराच्या सुमारास शिवसेनेचे कार्यकर्ते चंदगड तालुक्यातील सीमाभागात असणाऱ्या शेनोळी गावात पोहचले. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक कडेकूच केले. मात्र, वेशीवरच महाराष्ट्र पोलीस आणि कर्नाटक पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. सर्वच गाड्यांची कसून तपासणी केली जात होती. शिवसेनेचे कार्यकर्ते आणि कर्नाटक पोलीस आमने-सामने आल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. शिवसेनेकडून बेळगाव आमच्या हक्काचं असा नारा देत परिसर दणाणून सोडला. शिवसैनिक भगवा ध्वज घेऊन कर्नाटकात घुसण्याच्या तयारीत असतानाच कर्नाटक पोलिसांनी वेशीवरच त्यांना अडवून धरल्याने मोठा मोठी झटापट यावेळी झाली. त्यामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. कर्नाटक पोलिसांनी यावेळी लाठीचार्ज करून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसेनेच्या एकजुटीमुळे एकही कार्यकर्ता आंदोलनातून माघार फिरला नाही. अखेर शिवसेनेने आपली भूमिका जाहीर करत जवळपास अर्धा तास रस्त्यावर ठिय्या मारला.
तोपर्यंत माघार नाही -
महाराष्ट्र पोलिसांनी कर्नाटक पोलिसांना आपल्या हद्दीतून बाहेर घालवावे, अशी विनंती केली. जोपर्यंत बेळगाव महापालिकेसमोरील कन्नड संघटनेने उभा केलेला ध्वज उतरून घेत नाहीत व त्या ठिकाणी शिवसैनिक भगवा ध्वज फडकत नाहीत तोपर्यंत माघार घेतली जाणार नाही. असा इशारा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी दिला. कर्नाटक भाजप सरकारने शिवसैनिकांच्यावर दबावतंत्र वापरून गुंडगिरी करून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र, जशास तसे उत्तर दिल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही, असा इशारा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला. दरम्यान जवळपास दोन्ही बाजूकडील वाहतूक खोळंबली होती.