कोल्हापूर - मुस्लीम बांधवांसाठी सर्वात पवित्र म्हणून रमजान महिना ओळखला जातो. या महिन्याची सांगता म्हणजे रमजान ईद होय. गुरुवारी चंद्रदर्शन झाल्यानंतर आज(१४ मे्) देशभरात सर्वत्र रमजान ईद साजरी केली जात आहे. मात्र प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होणारी ईद कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी मुस्लीम बांधवांना साध्या पद्धतीने साजरी करावी लागत आहे. दरम्यान, रमजान ईद ला किती महत्व आहे आणि कशा पद्धतीने दरवर्षी ईद साजरी केली जाते, यासंदर्भात ईटीव्हीभारतचा हा विशेष रिपोर्ट ..
आपल्या कमाईतला अडीच टक्के भाग समाजासाठी -
वर्षभरातील कमाईमधील केवळ अडीच टक्के भाग हा मुस्लीम बांधवांनी समाजातील गरजू लोकांवर खर्च करावा असे म्हंटले जाते. त्या नुसार प्रत्येक मुस्लीम बांधव वर्षभरात आपापल्या परीने शक्य ती सेवा करत असतो. कोरोना काळात सुद्धा सेवा करण्याची सर्वांनी संधी मिळाली असून अनेकजण स्वतःला झोकून देऊन समाजासाठी सेवा देत आहेत. यामध्ये बैतुलमाल कमिटी, मणेर मस्जिद, मुस्लीम बोर्डिंग, वेगवेगळ्या जमाती, संस्था, आजरेकर फाउंडेशन तसेच वयक्तिक पद्धतीने अनेक मुस्लीम बांधवांनी समाजाच्या सेवेसाठी स्वतःला झोकून दिले आहे. काहींनी हॉस्पिटलमधील आयसीयू विभागासाठी मोठी मदत केली आहे, काहीजण मोफत ऑक्सिजन टाक्या देत आहेत, तर काही मुस्लीम बांधवांनी तर शेकडो मृतदेहांवर ज्या त्या धर्मानुसार अंत्यसंस्कार केले आहेत. ईद जरी साजरी करू शकले नसले तरी आपल्या हातून पुण्य घडावे हाच यामागचा हेतू असतो, अशी माहिती कोल्हापूर मुस्लीम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर यांनी दिली.
कोरोना समूळ नष्ट व्हावा, भारत देश प्रगतीपथावर यावा-
कोरोनामुळे देशाची प्रचंड मोठी हानी झाली आहे. अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अजूनही देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. गेल्या दीड वर्षांपासून देशात कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कोरोना समूळ नष्ट व्हावा आणि आपला देश पुन्हा एकदा प्रगतीपथावर यावा याच दुवा, प्रार्थना अल्लाहकडे करतो, असेही गणी आजरेकर यांनी म्हंटले आहे.