कोल्हापूर - रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळत नाही म्हणून रुग्ण तडफडत आहेत. याबाबत वारंवार सूचना करूनही त्याची दखल घेत नसाल तर, मला तुमची सर्व प्रकरणे बाहेर काढावी लागतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना दिला. रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध व्हावीत, यासाठी शेट्टी यांनी मित्तल यांना फोन तसेच मेसेजही केला होता. मात्र, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी मित्तल यांच्या कारभारावर आसूड ओढला.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून रुग्णांना उपचारादरम्यान रेमडेसिव्हिर हे इंजेक्शन दिले जाते. परंतु हे इंजेक्शन गोरगरीब लोकांच्या आवाक्याबाहेर आहे. जिल्हा परिषदेने ही इंजेक्शने मोफत देण्याचा चांगला निर्णय घेतला. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून ही इंजेक्शन मिळणे बंद झाले आहे. लोक इंजेक्शनसाठी फेऱ्या मारत आहेत. यासंदर्भात मित्तल यांच्याशी संपर्क साधला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. इंजेक्शनचा पुरवठा न करून ते रुग्णांच्या मरणाची वाट पाहत आहेत का, असा प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित केला.
सध्या जिल्हा परिषदेची कोविडमधील खरेदी राज्यात गाजत आहे. या खरेदीची कागदपत्रे जुळवण्यात मित्तल गुंग आहेत. पुरवठादार, कंत्राटदारांचे फोन घेण्यास व प्रतिसाद देण्यास त्यांना वेळ आहे, मात्र सामान्य लोकांच्या प्रश्नासाठी त्यांना वेळ नाही. त्यांच्या या भानगडी खपवून घेणार नाही, असे सांगत, गोरगरीब लोकांना इंजेक्शन पुरवठा करावा, यासाठी मित्तल यांना फोन केला होता, मात्र, त्यांची वागणूक ही बेजबाबदारपणाची असल्याचे सिद्ध झाले आहे. आता कोविड खरेदीतील भानगडी बाहेर काढण्यास भाग पाडू नका, असा इशाराही त्यांनी दिला.
जिल्हा परिषदमध्ये कोरोना साहित्य खरेदीत मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप जि.प. सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी केला होता. त्या पाठोपाठ प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी पुराव्यानिशी आरोप केले होते. तर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील भ्रष्टाचाराचे आरोप करून चौकशी मागणी नुकतीच केली आहे. त्यातच आता माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील जिल्हा परिषदेचे सीईओला इशारा दिला आहे.