कोल्हापूर - जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघातील उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. कोल्हापूर उत्तरमध्ये माझ्यावरोधात उमेदवार कोण असणार आहे हेच मला अद्याप समजले नसल्याचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हटले आहे. माझ्याविरोधात उमेदवारी घोषित करून तो उमेदवार पुन्हा दहा पावले मागे जातो. गेल्या 2 वर्षांपासून कोल्हापूर उत्तर मतदारसंघात निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्यामुळे मी केलेल्या कामांमुळे माझ्या विरोधात उमेदवार कोणीही असुदेत माझा विजय निश्चित असल्याचेही यावेळी क्षिरसागर यांनी म्हटले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बहुतांश सर्वच पक्षांचे उमेदवार जाहीर झाले आहेत त्या सर्वांनीच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पण कोल्हापूर उत्तर मतदार संघात शिवसेनेच्या विरोधात कोण उमेदवार असेल याबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे. कोल्हापूर उत्तरमधून स्वतः महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे निवडणूक लढविणार, अशी बरीच चर्चा कोल्हापुरात रंगली. पण युतीच्या जागावाटपाचा अद्याप काहीच निकाल लागला नसल्याने ही चर्चा सुद्धा आता बंद झाली आहे. गतवेळी भाजपचे उमेदवार महेश जाधव यांचा क्षीरसागर यांच्याकडून पराभव झाला. ते जाधव सुद्धा या मतदारसंघातून इच्छुक असून जगावाटपामुळे निवडणुकीच्या तयारीत अद्याप उतरले नाहीयेत.
*मधुरीमाराजे छत्रपती यांच्या उमेदवारीवर सर्वांचे लक्ष*
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार कोण असणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मधुरीमाराजे छत्रपती यांना काँग्रेसकडून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सद्या कोल्हापूर जिल्ह्यात आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात मधुरीमाराजे चांगली टक्कर देऊ शकतात असे अनेकांनी अंदाज बांधले आहेत. मात्र निवडणूक लढविण्याबाबत अद्याप मधुरीमाराजेंनी अधिकृत घोषणा केली नाहीये. त्यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.