कोल्हापूर - कोल्हापूरातील अंबाबाई मंदिराचे ( Kolhapur Ambabai Temple ) मूळ रूप आता सर्वांसमोर येणार आहे. कारण मंदिरात वेळोवेळी केलेल्या बदलांमुळे शिवाय मंदिरात संगमरवरी फरशांच्या केलेल्या वापरामुळे फरशीच्या आतील मूळ दगडी रूप झाकून गेले होते. मात्र, आता ते काढण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतल्यामुळे कोरीव काम केलेले दगड दिसू लागले आहेत. शिवाय लवकरच हे काम पूर्ण होणार असून मंदिराचे मूळ रूप दृष्टीक्षेपात येणार असून सर्वांना ते पहाता येणार आहे.
1500 वर्षांपूर्वीचे मंदिर, वेळोवेळी केले बदल - साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पिठ अशी करवीर निवासिनी आई अंबाबाई ची ओळख आहे. चालुक्यांच्या काळात इ.स. 700 वर्षांपूर्वी म्हणजेच सुमारे 1500 वर्षांपूर्वीचे हे अति प्राचीन मंदिर आहे. मंदिरात अनेक छोटी छोटी मंदिरे देखील आहेत. यातील काही मंदिर वर्षातून ठराविक वेळीच उघडली जातात. मंदिराच्या बांधणी आणि रचनेत अनेक वैशिष्ट्ये आढळतात यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मातृलिंग मंदिराचा देखील उल्लेख केला जातो. या वैशिष्ट्यपूर्ण आणि तितकेच धार्मिक महत्त्व असलेल्या अंबाबाई मंदिरात वेळोवेळी अनेक बदल करण्यात आले होते. त्यामधलाच एक बदल म्हणजे मंदिरात सत्तर वर्षांपूर्वी संगमरवरी फरशी बसवण्यात आली. यामुळे मंदिरातील दगडांवरील कोरीव काम झाकून गेले होते. मात्र हे उजेडात आले पाहिजे हा विचार घेऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने सर्व संगमरवरी फारश्या काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्यक्ष कामाला सुद्धा सुरुवात झाली आहे. त्यामुळे हळू हळू दगडांवरील कोरीव काम उजेडात येत आहे.
10 दिवसात काम पूर्ण होण्याची शक्यता - दरम्यान, मंदिरात प्रवेश करताना ज्या पायऱ्या आहेत. त्यावर सुद्धा संगमरवरी फरशी आहे. तिथून पूर्ण गाभाऱ्यापर्यंत या फरशी घालण्यात आल्या होत्या. त्यामुळे ते काढण्याचे काम सुरु असून येत्या 10 दिवसात ते पूर्ण होईल अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच अंबाबाई मंदिरातील मूळ दगडी रूप पाहता येणार आहे.