कोल्हापूर - राज्य सरकारने चर्चेचे आमंत्रण दिले असले तरी नाशिक, अमरावती, औरंगाबाद आणि रायगडचे नियोजित आंदोलन होणारच आहे. छत्रपती संभाजी राजे यांचा चेतावणी देण्याचा स्वभाव नाही. राज्य सरकारने चर्चेचे निमंत्रण दिले आहे. त्याचा निर्णय उद्या (गुरुवारी) घेऊ, या चर्चेच्या वेळी राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्यास नाशिकमध्ये होणारे आंदोलन आनंदोत्सव म्हणून साजरा करू, अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.
खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, की आज (बुधवार) कोल्हापुरात झालेल्या मुक्त आंदोलनाला जिल्ह्यातील दहा आमदार, खासदार आणि मंत्री महोदयांनी उपस्थिती लावली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्याशी बैठक लावण्याची ग्वाही दिली. या बैठकीबाबत लवकरच निर्णय घेऊ, मात्र या बैठकीला आम्ही सर्व गेलो, म्हणजे समाधानी झालो, असे राज्य सरकारने समजू नये. चर्चेला आम्ही जाऊच, आम्ही चर्चा करणार पण या चर्चेतून सकारात्मक निर्णय काय होणार? हे आम्ही पाहणार. जर आमच्या मागण्या निकाली लावल्या जाणार असतील तर त्या निर्णयाचा आम्ही निश्चित स्वागत करू, अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी दिली.
हेही वाचा -लोकप्रतिनिधींनो आता तुम्ही बोला..! भर पावसात मराठा आंदोलक कोल्हापुरात दाखल