कोल्हापूर - हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेऊनही, त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती थोडी बिघडली होती. खबरदारी म्हणून त्यांनी कोरोना चाचणी केली असता, बुधवारी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सद्या आपली प्रकृती ठीक असून गेल्या आठवड्याभरात जे कोणी संपर्कात आले असतील, त्यांनी तत्काळ आपली चाचणी करून घ्यावी, असे आवाहन खासदार माने यांनी केले.
खासदार मानेंचे नागरिकांना आवाहन
गेल्या दोन तीन दिवसांपासून कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने, कोविड चाचणी केली असता पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू केले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी त्यांची तत्काळ टेस्ट करून घ्यावी आणि दक्षता घ्यावी. तसेच कोणतीही मदत लागल्यास माझी संपूर्ण टीम आपल्या सेवेमध्ये तत्पर आहे. लवकरच मी आपल्या सेवेमध्ये पुन्हा रुजू होईल. तरी सर्वांनी आपली आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे आवाहन सुद्धा खासदार धैर्यशील माने यांनी जनतेला केले आहे.
कोरोनाबाबत घेतात खूप काळजी
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यापूर्वी त्यांच्या नातेवाईकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे खासदार माने विशेष काळजी घेताना पाहायला मिळत होते. कोणाच्याही हातात हात न देणे, मतदारसंघातील नागरिक प्रश्न घेऊन त्यांच्या निवासस्थानी येत असतील, तर ठराविक अंतरावरूनच त्यांच्याशी संवाद साधणे, वारंवार सॅनिटायझरचा वापर करणे, मात्र यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे लसीचे दोन डोस घेऊनही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
हेही वाचा - 'बार्ज पी३०५' वरील ३७ कर्मचाऱ्यांचे मृतदेह आढळले; १८८ जणांना वाचवण्यात यश, बचावकार्य सुरुच..