कोल्हापूर - मराठा आरक्षण आणि कोरोनाच्या वाढत्या महामारी विषयावर विशेष संसदीय अधिवेशन बोलवण्यात यावे अशी मागणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी मागणी केली आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून ही मागणी केली असल्याचे माने यांनी माहिती दिली आहे.
मराठा समाजात आता असंतोष निर्माण झाला आहे - माने
देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहलेल्या पत्रात खासदार धैर्यशील माने यांनी कोरोना तसेच महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर महाराष्ट्रात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. मराठा समाजातील तळागाळातील वंचित असणाऱ्या तरुण-तरुणींच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाल्याच्या भावना सुद्धा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आता उद्रेक होण्याची शक्यता असून त्याची गंभीरता लक्षात घेऊन महाराष्ट्रमध्ये असणाऱ्या एकूण लोकसंख्येच्या 32 टक्के मराठा समाज आणि या समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आरक्षणाची त्यांना नितांत गरज असल्याचेही धैर्यशील माने यांनी म्हटले आहे. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी राष्ट्रपतींनी मराठा समाज आरक्षण विषयावर आणि कोरोना महामारी बाबत विशेष अधिवेशन बोलावण्याची आवश्यकता असल्याचेही धैर्यशील माने यांनी म्हटले आहे.
तर ऑनलाइन अधिवेशन घ्या -
महाराष्ट्रासह देशात सध्या करण्याची अवस्था बिकट बनली आहे. अनेकांना ऑक्सिजन मिळत नाही तर अनेकांना व्हेंटिलेटरसाठी भटकावे लागत आहे. कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस आणखीनच गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे यासंदर्भात तत्काळ अधिवेशन बोलवावे असे खासदार धैर्यशील माने यांनी म्हंटले आहे. अधिवेशनसाठी आपण जर कोरोनाचे कारण पुढे करत सोशल डिस्टन्सचा मुद्दा उपस्थित करणार असाल तर त्यासाठी ऑनलाइनचा सुद्धा पर्याय आपण वापरू शकतो, असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.