कोल्हापूर - श्रमिक विशेष रेल्वे आज ( गुरूवार ) कोल्हापुरातील परप्रांतीय मजुरांना घेऊन रवाना झाली. मध्यप्रदेशमधील तब्बल 1 हजार 456 मजुरांना घेऊन ही रेल्वे छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून रवाना झाली. आत्ता पर्यंत कोल्हापुरमधून पाच विशेष रेल्वे परप्रांतीय मजुरांना घेऊन रवाना झाल्या आहेत.
उत्तरप्रदेश शासनाकडून मंजुरी आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने करवीरमधील 1276, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील 114, हातकणंगले तालुक्यातील 60 आणि कागल तालुक्यातील 6 अशा 1456 मजुरांची यादी करून रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून उत्तरप्रदेशकडे जाणाऱ्या रेल्वेचे नियोजन केले होते. कोल्हापूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या बसमधून मंजुरी मिळालेल्या कामगारांना छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे आणण्यात आले. त्यानंतर त्यांना प्रवासाची रेल्वे तिकीटे देण्यात आली. जिल्हा प्रशासन आणि सेवाभावी संस्थांच्यावतीने या मजुरांना जेवण, नाश्ता आणि पाणी अशा किटचे वाटप करण्यात आल्यानंतर मजूर गावी रवाना झाले.
आपल्या गावी जात असल्याने आणि प्रशासनाने त्यांची केलेली सुविधा याबाबत प्रत्येक मजुराच्या चेहऱ्यावर आनंद जाणवत होता. या विशेष रेल्वेला तहसीलदार शीतल मुळे-भामरे, डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्नीकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून उत्तर प्रदेशकडे ही रेल्वे मार्गस्थ झाली. यावेळी रेल्वेचे स्टेशन प्रबंधक ए. आय. फर्नांडिस, नगरसेवक तौफिक मुल्लानी, बाबू बुचडे, प्रविण पाटील, तानाजी लांडगे, महेश वारके आदी उपस्थित होते.