कोल्हापूर - आयुष्यभर केवळ सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी आपलं आयुष्य वेचलेल्या ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील (N D Patil Passes Away) यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत आहे. त्यांच्यावर प्रेम करणारा वर्ग मोठा आहे. यामध्ये लहान मुलांपासून अगदी थोरांपर्यंत सर्वांच्याच प्रा. एन. डी. पाटील जवळचे होते. याचीच प्रचिती कोल्हापुरात आली. येथील एका 'मायक्रो आर्टिस्ट' (Micro Artist) युवतीने प्रा. पाटील यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे. पेन्सिलच्या टोकावर "RIP ND SIR" कोरत तिने अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. स्नेहल माने (Micro Artist Snehal Mane) असे या मायक्रो आर्टिस्ट युवतीचे नाव आहे.
- प्रा. एन. डी. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार :
ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांच्यावर आज (18 जानेवारी) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर येथील कसबा बावड्यातील पंचगंगा स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्य शासनाच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार अरुण लाड, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनीही दिवंगत प्रा.एन. डी. पाटील यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र, पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी हवेत झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली. यावेळी प्रा. एन. डी. पाटील यांच्या पत्नी सरोज उर्फ माई, मुलगा प्रशांत व सुहास, स्नुषा संगीता, नात रिया यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबातील मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीत प्रा. पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.