कोल्हापूर - २१ मार्चला सकाळी महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापुरात पोहचलेल्या प्रवाशांनी आपली वैद्यकीय तपासणी सीपीआरमधून करावी. या रेल्वेने प्रवास केलेल्या प्रावाशांनी पुढील १४ दिवस स्वतःचे विलगीकरण करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.
कोल्हापुरात भक्तीपूजा नगरमध्ये सापडलेला कोरोनाग्रस्त रुग्ण पुण्याहून महालक्ष्मी एक्सप्रेसने रात्री निघून तो 21 मार्चला सकाळी 7 वाजता कोल्हापुरात पोहचला होता. त्याने जनरल डब्यातून प्रवास केला होता. खबरदारीचा उपाय म्हणून या दिवशी या रेल्वेने प्रवास केलेल्या प्रवाशांनी याबाबत कळवावे. तसेच सर्दी, ताप, खोकला, धाप आदी लक्षणे असल्यास त्वरित सीपीआर रुग्णालयात येवून तपासणी करुन घ्यावी. इतर प्रवाशांना कोणतीही लक्षणे नसली तरीही पुढील १४ दिवसांसाठी कुटुंब किंवा इतर कोणाशीही संपर्क होणार नाही, वस्तुंची देवाण घेवाण होणार नाही, स्वच्छता व अलगीकरणाची सर्व खबरदारी घेवून स्वतः स्वतंत्रपणे अलगीकरणात रहावे, असेही डॉ. कलशेट्टी यांनी म्हटले आहे.