कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी जाहीर केली आहे. अत्यावश्यक सेवा सोडून कोणीही घराबाहेर पडू नये असे आदेश असतानाही नियमांचे उल्लंघन करून बाहेर पडणाऱ्यांवर कोल्हापूर पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. यानुसार शनिवारी दिवसभरात नाकाबंदी दरम्यान, तब्बल 2139 वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे तर 307 वाहने जप्त सुद्धा करण्यात आली आहेत. त्यांच्याकडून एकूण 3 लाख 86 हजारांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
नागरिकांना अजूनही गांभीर्य नाही
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा कडक निर्बंध घालण्यात आले असून केवळ अत्यावश्यक सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही रस्त्यांवर फिरता येणार नाहीये. मात्र तरीही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांसह विनामास्क फिरणाऱ्यांवर सुद्धा कोल्हापूर पोलिसांनी कारवाई केली आहे. नागरिक अजूनही मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी आता कडक कारवाई करायला सुरुवात केली आहे. त्यातून एकूण 3 लाख 86 हजार 400 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
72 दुचाकीही जप्त
दिवसभरात कारवाई करण्यात आलेल्या वाहनांमध्ये 944 दुचाकींचा समावेश असून यापैकी 72 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत 54700 रुपयांचा दंड वसुल करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलीस शाखेच्या निरीक्षक स्नेहा गिरी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. लॉक डाऊन उठल्यानंतर पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशानुसार ही वाहने परत केली जाणार आहेत.
अशी झाली कारवाई
- विना मास्क - 388 जणांवर कारवाई
- विना मास्क दंड - 1 लाख 10 हजार 600 रुपये
- विनाकारण वाहन घेऊन घराबाहेर पडलेले - 2 हजार 139
- एकूण वाहने जप्त - 307
- विनाकारण वाहन घेऊन घराबाहेर पडलेल्यांकडून वसूल केलेला दंड - 2 लाख 75 हजार 800 रुपये