कोल्हापूर : नियमांचे पालन करण्याबाबत पोलीस नेहमीच आवाहन करत असतात. मात्र वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर पोलिसांनी केलेले ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. नियमांचे पालन करा, 'वटपौर्णिमेच्या' भरवश्यावर राहू नका, अशा आशयाच्या ट्विटची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
पोलिसांनी केलेअनोखे ट्विट
'कार चालवताना "सीट बेल्ट" आणि बाईक चालवताना "हेल्मेट" नेहमी वापरा. रस्त्यावर फिरताना 'मास्क' वापरा, "वटपौर्णिमेच्या" भरवशावर राहू नका', अशा आशयाचे हे ट्विट सध्या चर्चेत आहे. नेहमीच कडक भूमिकेत पाहिलेल्या पोलिसांकडून अशा मजेशीर पद्धतीने आवाहन केल्याने सोशल मीडियावर सुद्धा ते अनेकांपर्यंत पोहोचले आहे. खरंतर आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिला आपल्या पतीला दिर्घायुष्य मिळावे, शिवाय पुढचे सात जन्म हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करत असतात. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी हे अनोखे ट्विट केले आहे. यापूर्वी सुद्धा अनेक वेळा अशा पद्धतीने मजेशीर ट्विट केल्याने त्याची चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा कोल्हापूर पोलिसांच्या या ट्विटची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
हेही वाचा - इस्लामपूरमध्ये वटपौर्णिमेनिमित्त शंभर वडाच्या रोपांचे वाटप