कोल्हापूर - 'ब्रेक द चेन' अंतर्गत लावण्यात आलेल्या निर्बंधांना हरताळ फासणाऱ्या कोल्हापूर वासीयांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या, मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. गेल्या २५ दिवसांत कोल्हापूर पोलिसांनी तब्बल १ कोटी ५ लाखांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. शैलेश बलकवडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
हेही वाचा - विशेष : कोल्हापुरातल्या तरुणांनी निसर्गरम्य वातावरणात सुरू केले कोविड केअर सेंटर
जिल्ह्यात २ हजार पेक्षा जास्त पोलीस दिवसरात्र रस्त्यांवर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून दिवसरात्र २ हजारपेक्षा जास्त पोलीस बंदोबस्तात आहेत. तसेच, शहरात १२ मोबाईल व्हॅन गस्तीवर आहेत. शहरात जवळपास २० ठिकाणी नाकेबंदी केली असून जिल्ह्यातील प्रमुख शहरात व तालुकास्तरावर नाकेबंदी करण्यात आली आहे.
दंड करणे हा हेतू नाही पण..
कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. नागरिक विनाकारण रस्त्यावर येत आहेत. लोकांना रोजगार नाही. अशात नागरिकांकडून दंड वसूल करणे हा हेतू नाही, पण नियम पाळावेत म्हणून कारवाई करावे लागते, अशी प्रतिक्रिया जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. शैलेश बलकवडे यांनी दिली.
पोलिसांनी आजवर केलेली कारवाई व वसूल केलेला दंड
मास्क कारवाई - १६ हजार ६१४
दंड वसूल - ३५ लाख २९ हजार ४०० रुपये
वाहन जप्त - ५ हजार ३०८
मोटार वाहन केसेस - ६२ हजार ७३४
दंड वसूल- १ कोटी ५ लाख ७८ हजार ४०० रुपये
हेही वाचा - कोल्हापुरात 3190 बालकांना कोरोनाची लागण