कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोमवारी आरक्षण सोडत पार पडली. सोडतीवेळी बहुतांश प्रभाग आरक्षणे ही प्राधान्यक्रमाने ठरविण्यात आली. हा प्राधान्यक्रम कसा ठरविला याबाबत आरक्षण सोडतीवेळी अनेक नागरिकांनी सन 2005 व 2010 च्या निवडणुकीची आरक्षणे कोणत्या पद्धतीने धरली आहेत, अशी विचारणा केली. परंतु प्रशासनाकडून त्यास संयुक्तिक उत्तर मिळाले नाही. तसेच कोणीही प्रश्न विचारल्यास त्यांना प्रशासनाकडून 'लेखी हरकत घ्या' असे सांगण्यात आले. महानगरपालिकेकडून मिळालेल्या महितीवरूनच अनेक प्रभागात वारंवार तीच तीच आरक्षणे पडल्याचा समज होतो आहे. यासर्व आरक्षण सोडत प्रक्रीयेबाबत व पद्धतीबाबत भाजपा शिष्टमंडळाने आज कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना निवेदन सादर केले.
अजित ठाणेकर यांनी आरक्षण सोडतीमधील उपस्थित केल्या शंका -
यावेळी अजित ठाणेकर म्हणाले, सोडत पारदर्शीपणाने होत असल्याबद्दल काल सोडतीवेळी अधिकारी वारंवार सांगत होते. मात्र जोपर्यंत सध्याच्या प्रभागावरील सन 2005 आणि 2010 ची आरक्षणे कशा पद्धतीने निश्चित केली हे जनतेला कळत नाही तो पर्यंत ही सोडत पूर्णांशाने पारदर्शी झाली असे म्हणता येणार नाही असेही ठाणेकर म्हणाले.
भाजपने सादर केलेल्या निवेदनात खालीलप्रमाणे माहिती मिळावी अशी विनंती केली आहे -
1) विद्यमान प्रभाग रचनेनुसार असलेल्या 81 प्रभागांवर सन 2005 आणि 2010 च्या निवडणुकीत पडलेली आरक्षणे कशाप्रकारे निश्चित करण्यात आली त्याची माहिती आणि त्या संबंधात असलेले निवडणूक आयोग अथवा राज्य सरकारचे नियम/आदेश/मार्गदर्शक तत्वे यांची माहिती मिळावी.
2) सोडतीदरम्यान विद्यमान 81 प्रभागांवर सन 2005 व 2010 साली कोणती आरक्षणे धरण्यात आली त्याची माहिती.
3) प्रभाग रचनेमध्ये बदल करण्यासाठी आवश्यक कालावधी संदर्भात निवडणूक आयोग अथवा राज्य सरकारचे नियम/आदेश/मार्गदर्शक तत्वे असल्यास त्यांची माहिती मिळावी.
4) 2015 सालच्या प्रभाग रचनेनुसार असलेल्या कोणत्या प्रभागात यावर्षी बदल करण्यात आला त्याची माहिती मिळावी.