कोल्हापूर - दरवर्षी कोल्हापूरातील गणेश विसर्जन मिरवणूक 30 ते 35 तास चालते. मात्र, यंदा केवळ 18 तासांमध्ये शहरातील सर्वच मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत सर्वच विसर्जन पार पडले. त्यामुळे कोल्हापुरातील गणेश मंडळांनी प्रशासनाच्या सर्वच सूचनांचे मनापासून पालन केल्याचे दिसून आले असून त्यांच्या या प्रतिसादाबद्दल कोल्हापूरच्या महापौर निलोफर आजरेकर यांनी आभार मानले आहेत.
'आपल्या प्रतिसादामुळे कोरोनासारख्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात सुद्धा मोठे यश आले' असे महापौरांनी कोल्हापूरकरांना म्हटले आहे. जिल्हा प्रशासन आणि कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना, तालीम संस्थांना यंदा मिरवणूक न काढता अगदी साधेपणाने विसर्जन पार पाडावे, असे आवाहन केले होते. त्याला सर्वांनीच प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.
हेही वाचा - कोल्हापूरच्या पहिल्या मानाच्या गणपतीचे साधेपणाने विसर्जन
जिल्ह्यात कोरोनाने अक्षरशः कहर केला आहे. यातच विसर्जनावेळी आणखी प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता होती. मात्र यासाठी प्रशासनाकडून नेटके नियोजन केल्याने प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला यशच आल्याचे दिसून आले आहे. प्रत्येक मंडळातील केवळ 3 सदस्यांना विसर्जनासाठी सोबत येण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आला होता. मात्र, नागरिकांनीच मनावर घेतले असल्याने अगदी साधेपणाने हे विसर्जन पार पडले. त्यामुळे महापौर आजरेकर यांनी सर्वच गणेश मंडळाचे तसेच तालीम संस्थांचे आभार मानले असून यापुढेही प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे अशाच पद्धतीने पालन करण्याचे आवाहन केले आहे.