कोल्हापूर - कोल्हापुरात जिल्हा बँके निवडणुकीची (Kolhapur District Bank Election) रणधुमाळी सुरू आहे. ५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी 21 जागांपैकी 15 जागांवर निवडणूक होणार आहे. यात अगोदरच 6 जागा बिनविरोध झाल्यामुळे राहिलेल्या जागांसाठी चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. राज्यामध्ये सत्तेत असणारे दोन पक्ष विरोधात तर राज्यात विरोधात असणारा विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांच्या बरोबर असं वेगळं राजकीय चित्र कोल्हापूर जिल्ह्यात अनुभवायला मिळत आहे.
कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, काँग्रेस,जनसुराज्य आणि राज्यातील विरोधी पक्ष असणारा भाजप यांनी एकत्र येत राजर्षी शाहू विकास आघाडी करून निवडणूक रिंगणात (Kolhapur District Bank Election) उतरले आहेत, तर शिवसेना, शेकाप आणि मित्रपक्ष यांनी राजश्री शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडी करून सत्ताधारी नेत्यांसमोर आव्हान निर्माण केलं आहे. तर आज कोल्हापुरात शिवसेना आणि मित्र पक्षांनी एकत्र पत्रकार परिषद घेत विरोधकांवर चांगलीच तोफ डागली आहे. दरम्यान शिवसेनेने उभा केलेल्या 9 च्या 9 जागांवर राजश्री शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचाच विजय होईल, असा विश्वास देखील यावेळी व्यक्त केला आहे.
९ च्या ९ जागांवर आमचे पॅनल विजय होईल- मंडलिक
आज आयोजित पत्रकार परिषदेत खासदार संजय मंडलिक यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. शिवसेनेला योग्य तो सन्मान न दिल्याने आज ही निवडणूक होत आहे. शिवसेनेने सत्ताधाऱ्यांकडे 3 जागा मागितल्या होत्या मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने 2 जागा देण्यास तयार होते आणि ते आम्हाला मान्य नव्हते. जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आम्हाला 3 जागा दिल्या असत्या तर ही वेळ आली नसती. मात्र आता आम्ही वेगळे पॅनल तयार करून लढत आहोत. मतदारांचादेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्हाला विश्वास आहे, की ९ च्या ९ जागांवर आमचेच पॅनल विजयी होईल. सेवा संस्थांमध्ये आमचे बरेच उमेदवार होते. जिथे वाद टोकाला गेले नाही तिथे आम्ही माघार घेतली होती. जे काही 6 बिनविरोध झाले आहेत ते आमच्यामुळेच झाले आहेत. त्यामुळे त्यांनी फार टिमकी वाजवू नये, असा टोला देखील मंडलिक यांनी विरोधकांना लगावला आहे.
सत्ता आणि पैशांच्या जोरावर राजकारण - चंद्रदीप नरके
महाविकास आघाडी स्थापन झाल्यावर देखील जिल्हा परिषद मध्ये माझ्या भागातील आमदार पी. एन. पाटील हे आमचे विरोधक आहेत. विधानसभा त्यांच्याविरूध्द लढलो. मात्र, जिल्हा परिषदेमध्ये त्यांचा मुलगा राहुल पाटील यांना अध्यक्ष केले. ते केवळ पक्षप्रमुखांच्या आदेशामुळे. एवढी सहनशीलता आम्ही तिथे दाखवली अशा प्रकारचे सहकार्याचे वातावरण जिल्हा बँकेतील विरोधी पक्षाकडून अपेक्षित होते. तसेच सत्तापरिवर्तन कोणामुळे झाले याचे आत्मपरीक्षण करणे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला गरजेचे होते. कोल्हापूर जिल्ह्यात सत्ता आणि पैशाच्या जीवावर कोणतेही राजकारण टोकाला नायचे काम चालू आहे, तसेच कोणतीही निवडणूक बिनविरोध करू शकतो अशा भावनेला मोडण्याचे काम शिवसेनेने केले असल्याचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी म्हटले.
जिल्हा बँकेत राजकारण होत नसेल तर आजरा कारखाना बंद का पडला? भोगावती आणि आजरा कारखान्यांवर कर्ज किती आहे, हे तपासून पाहायला पाहिजे. गडहिंग्लज कारखाना बंद पडण्याचे कारण काय? चंदगड कारखान्याची अवस्था काय झाली? हे सर्वांना माहीत आहे. तत्त्वज्ञान सांगायचे, संत तुकारामांची गाथा सांगायची, राजकीय पादत्राणे बाहेर ठेवली म्हणूनही सांगायचे मात्र याउलट सर्व राजकारणासाठी बँकेचा वापर केला जात आहे. तर गडहिंग्लज कारखाना स्थनिक लोकांनी वर्गणी काढून सुरु केला हेच जिल्हा बँकेचे मोठे अपयश असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी म्हटले. जिल्हा बँकेत राजकारण आणले नाही, असं म्हणून सत्तारूढ आघाडीच्या नेत्यांकडून सांगितले जाणारे संत वचन बंद करावे, अशी टीका आमदार प्रकाश आबिटकर यांनी केली आहे.