कोल्हापूर - येथील एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कालपासून बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. आज दुसऱ्या दिवशी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. आज सकाळपासून कोल्हापूर विभागातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्यानंतर एसटीची वाहतूक सुविधा ठप्प झाली आहे. अचानक काम बंद केल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. आज सकाळपासून केवळ 15 टक्के मार्गावर एसटीची फेरी सुरू झाली. मात्र, सकाळी आठ वाजल्यापासून सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने कोल्हापुरात येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्वच एसटीच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
अनेक प्रवासी मध्यवर्ती बस स्थानक परिसरात खोळंबले
एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. आज आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक पणे काम बंद आंदोलन पुकारले आहे. एसटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झाला असून राज्य सरकारने त्वरित मागण्या मान्य करावेत अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीने केली आहे. दरम्यान आज सकाळपासून कोल्हापूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. अनेक प्रवासी मध्यवर्ती बस स्थानक परिसरात खोळंबले आहेत. अचानक एसटी सेवा बंद झाल्याने त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. प्रवाशांचे देखील हाल झाले आहेत. आज सकाळपासून केवळ संभाजी आगार, मध्यवर्ती बस स्थानक या ठिकाणाहून कल्याण, मुंबई, पुणे, ठाणे या ठिकाणी एसटीच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. मात्र, सकाळी आठ वाजल्यापासून एसटीची पूर्ण सेवा ठप्प झाली आहे.
तर एसटी वर परिणाम होऊन प्रवाशांचे हाल
राज्य सरकारने तत्काळ या मागण्या मार्गी लावावेत. अशी मागणी एसटी कर्मचारी संघटनांकडून होत आहे. जर राज्य शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास येणाऱ्या काळात सर्व कर्मचारी या आंदोलनात सहभागी होऊ शकतात. त्यामुळे त्याचा परिणाम एसटीच्या वाहतुकीवर होऊ शकतो. परिणामी सणासुदीच्या काळात प्रवाशांना याचे हाल सोसावे लागणार आहेत.
एसटी कर्मचारी कृती समितीच्या मागण्या
- एस.टी.महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण झालेच पाहिजे.
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८% महागाई भत्ता दिवाळीपूर्वी मिळालाच पाहिजे.
- वाढीव घरभाडे ८,१६, २४ या दराने मिळालेच पाहिजे.
- सर्व सण उचल १२,५०० रूपये मिळालीच पाहिजे.
- वार्षिक वेतन वाढ २% वरून ३ % मिळालीच पाहिजे.
- न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे ठरलेल्या तारखेस नियमित वेतन मिळालेच पाहिजे.
- दिवाळी बोनस १५,०००/- रूपये मिळालाच पाहिजे.
हेही वाचा - Aryan Khan Drug Case आर्यन खानच्या जामिनावर आज पुढील सुनावणी