कोल्हापूर - 10 लाखांची लाच स्वीकारताना कोल्हापुरातील प्राप्तिकर निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. प्रताप महादेव चव्हाण (वय 35, रा. कोल्हापूर) असे या निरीक्षकाचे नाव आहे. एका डॉक्टरला अवैद्य संपत्ती जमवली असल्याबाबतचा निनावी अर्ज आयकर विभागाकडे प्राप्त झाला होता. त्याची चौकशी सुरू होती. मात्र, संबंधित डॉक्टरवर छापा टाकून कारवाई टाळण्यासाठी प्राप्तिकर निरीक्षकाने 20 लाखांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र आज तडजोडीनंतर दहा लाखांची लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या कारवाईनंतर संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार -
कोल्हापूर लाचलुचपत विभागाचे पोलीस उप अधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील एका डॉक्टर विरोधात अज्ञात व्यक्तीने प्राप्तीकर विभागाकडे एक अर्ज केला होता. या अर्जात संबंधित डॉक्टरने अवैद्य संपत्ती जमवल्याचे सांगण्यात आलं होतं. त्यादृष्टीने प्राप्तीकर विभागाकडून संबंधित डॉक्टरची गेल्या काही दिवसांपासून चौकशी सुरू होती. या चौकशी दरम्यान संबंधित डॉक्टरच्या घरावर छापा टाकणार असल्याचं निरीक्षक प्रताप चव्हाण यांनी डॉक्टरला सांगितलं होतं. ही कारवाई रोखण्यासाठी निरीक्षक चव्हाण याने 20 लाख रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 14 लाखांवर दोघांमध्ये समझोता झाला होता. मात्र संबंधित डॉक्टरने याबाबत रात्री उशिरा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार आज लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विल्सन पूल नजीक ठरलेल्या रक्कमेतील 10 लाख रुपये लाच डॉक्टरकडून स्वीकारताना निरीक्षक प्रताप चव्हाण याला रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे.