कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णालयांची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी आणि काही प्रमाणात उद्योगांनाही पुरवठा करण्यासाठी पुणे येथून ऑक्सिजन मागवावेत. त्यासाठी दोन टँकर भाड्याने घेण्याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे तात्काळ पाठवावा, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्री पाटील यांनी ऑक्सिजन उत्पादक, पुरठादार आणि उद्योजकांसोबत बैठक घेतली. शनिवारी 19 सप्टेंबर रोजी 'कोरोनाचं महासंकट अन् महाराष्ट्रातील ऑक्सिजनची परिस्थिती' या आशयाची बातमी 'ई टीव्ही भारत'ने प्रसारित केली होती. यामध्ये कोल्हापुरातील सद्याची परिस्थितीसुद्धा मांडली होती. त्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील तात्काळ परिस्थितीचा आढावा घेत आणखी दोन टँकर भाड्याने घेणार असल्याचे म्हंटले आहे.
हेही वाचा - बैतुलमाल कमिटीचा पुढाकार; मुस्लीम बांधवांनी केले 200 कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार
यावेळी बैठकीत पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यातील ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादार यांनी वैद्यकीय कारणासाठी ऑक्सिजन सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. त्यासाठी जिल्ह्याची एकूण मागणी पुरवण्यासाठी वाढीव उत्पादन तसेच पुरवठा वाढवावा. उद्योजक असोसिएशननी एकत्रपणे बैठक घेवून उद्योगांना लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी एखादा टँकर यांच्यावतीने भाड्याने घ्यावा. त्यांना ऑक्सिजन पुरवण्यात येईल, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले आहे.
शिवाय जिल्ह्याची 49 मे. टन वैद्यकीय रुग्णालयांची ऑक्सीजनची मागणी पूर्ण करण्यासाठी दोन टँकर भाडेतत्वावर करार करावेत आणि तसा प्रस्ताव तात्काळ विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठवावा, असे सांगून पालकमंत्री पाटील यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशी संपर्क साधून या प्रस्तावाला मान्यता देण्याची सूचनाही केली.
पालकमंत्र्यांनी पुण्यातील उत्पादक कंपन्यांशी साधला संपर्क
पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुणे येथील इनॉक्स, टीएनएस या ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपाध्यक्ष यांच्याशीसुद्धा संपर्क साधला. कोल्हापूर येथील कंपन्यांना पुरवठा वाढवण्याबाबत त्यांनी मागणी केली. यानुसार सीपीआर रुग्णालयात पाच मे. टन ऑक्सिजन देण्याचे तसेच कोल्हापूरमधील ऑक्सिजन पुरवठादारांना वाढीव ऑक्सिजन पुरवले जाईल, असे सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याबरोबरच एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, महालक्ष्मी प्रा.लि.चे जितेंद्र गांधी, अध्यक्ष रणजित शहा, विश्वास पाटील, सचिन शिरगावकर, अमर तासगावे, कोल्हापूर गॅसचे राजेंद्र गाडवे आदी उपस्थित होते.