कोल्हापूर - पंढरपूरला कोणी कोणाला घालवले, हे दीड वर्षांपूर्वीच सिद्ध झाले आहे. असा पलटवार उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी भाजपच्या आशिष शेलार यांना लगावला आहे. शिवसंपर्क अभियानवरून आशिष शेलार यांनी कोण कितीही पक्ष वाढवू दे, त्यांना पंढरपूरला घालवणार,अशी टीका शिवसेनेवर कोल्हापुरात केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना सामंत बोलत होते.
उदय सामंत म्हणाले, शिवसंपर्क अभियान हे बारा दिवसांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. सामाजिक उपक्रमासोबत पक्ष वाढविण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी आज कोल्हापूर दौऱ्यावर आलो असल्याचे सामंत यांनी सांगितले. पक्ष वाढवण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्यादृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे, असेही सामंत म्हणाले.
उच्च शिक्षण सहसंचालक पदाच्या मुलाखतीत भ्रष्टाचार झाल्याची चर्चा आहे. त्यावर बोलताना उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. मुख्य प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली या मुलाखती झाल्या. तज्ञांनी निवड केल्यानंतर असे आरोप होणे, म्हणजे दुर्दैवी आहे.असे सामंत म्हणाले.नाणार रिफायनरी प्रकल्प हा विषय शिवसेनेसाठी संपला आहे. नागरिकांचा विरोध असेल तर कोणताच प्रकल्प होऊ द्यायचा नाही. ही भूमिका शिवसेनेची आहे. जर कोणी ठामपणे सांगत असेल. हा प्रकल्प गरजेचा आहे. तर त्यामागे शिवसेना खंबीरपणे उभे राहील. असे मत सामंत यांनी व्यक्त केले.बारावीचे निकाल अद्याप लागले नसल्याने सीईटी परीक्षा झालेली नाही. राज्य सरकारने सीईटीची लिंक जाहीर केली आहे. परीक्षा ऑगस्टमध्ये पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मात्र जोपर्यंत बारावीचा निकाल येत नाही. तोपर्यंत सीईटीची परीक्षा होणार नाही. असे सामंत यांनी स्पष्ट केले. 15 सप्टेंबर पासून शैक्षणिक वर्ष सुरू होईल, ते ऑनलाईन की ऑफलाइन हे स्पष्ट केलेलं नाही. मात्र ऑफलाइन सुरू होण्याची शक्यता नाही. असे देखील सामंत म्हणाले.
काय म्हणाले होते आशिष शेलार -
भाजपचे नेते आशिष शेलार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. शिवसेनेच्या पक्ष विस्ताराबाबत बोलताना आशिष शेलार म्हणाले, की हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. कोणी पक्ष विस्तारासाठी काहीही करावे किंवा स्वबळावर लढण्याबाबत बोलावे. पण यापुढे ज्या निवडणुका येतील त्या सर्व निवडणुकामध्ये यांना पंढरपूरच दाखविणार आहे, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला होता.
शेलारांची नाना पटोले यांच्यावरही टीका -
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले आपल्या विधानावर कधीही ठाम रहात नाहीत. हवामान बदलले की त्यांची वक्तव्य बदलतात अशा शब्दांत भाजप प्रवक्ते आशिष शेलार यांनी पटोलेंवर टीका केली होती. जे स्वतःच्या विधानावर ठाम राहू शकत नाहीत त्यांची केस काय टिकणार असे म्हणत त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही असेही शेलार म्हणाले होते.