कोल्हापूर - जिल्ह्यासह परिसरातील विविध भागात आज सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. शनिवारी दुपारपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले होते. सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागायतदारांसह शेतकऱ्यांच्या इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात आज सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली. या पावसामुळे शहरातील काही बांधकाम साईट्सवर कामगारांसाठी उभे करण्यात आलेल्या अनेक निवाऱ्यांचे छत सुद्धा उडून गेल्याच्या घटना घडल्या. दोनच दिवसापूर्वी कोल्हापुरात झालेल्या पावसामुळे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या ऊसतोड मजुरांच्या झोपड्या उद्ध्वस्त झाल्या होत्या. त्यानंतर आजही पावसाने जोरदार हजेरी लावली.
सलग तीन दिवस होत असलेल्या या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कलिंगड, काजू, आंबा आदी पिकांचे सुद्धा अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊनमूळ पिकं शेतातच उभी आहेत. त्यातच वळवाचा पाऊस पडल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील ग्रीन हाऊसचे सुद्धा छत उडून गेल्याच्या घटना घडल्याने ते शेतकरीसुद्धा मोठ्या अडचणीत आले आहेत. उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना मात्र या पावसाने दिलासा मिळाला आहे.