कोल्हापूर - गेल्या दोन दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात संततधार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. अनेक ठिकाणी वाहतूक मार्ग बंद झाल्याने त्याचा परिणाम थेट गोकुळच्या दूध संकलनावर झाला आहे. येत्या काही दिवसात पाऊस असाच राहिला तर जिल्ह्यातील सर्व मार्ग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पुढील काळात गोकुळचे दूध संकलन बंद होऊ शकते, अशी माहिती गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली.
दळणवळणाची सुविधा उपलब्ध नाही
गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापुरात पावसाचे थैमान आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना महापूर आला आहे. अनेक मार्गावर पाणी असल्याने दळणवळणाची कोणतीच सुविधा उपलब्ध नाही. वाहतूक बंद झाल्याने त्याचा परिणाम थेट गोकुळच्या दूध संकलनावर होत आहेत. गोकुळ दूध संघ हा दररोज 15 लाख लिटर दूध संकलन करतो. मात्र काल गोकुळच्या दूध संकलनावर परिणाम झाला.
76 हजार लिटरची घट
कोल्हापुरात आलेल्या महापुरामुळे काल गोकुळच्या दूध संकलनामध्ये 76 हजार लिटरची घट झाली. तर आज सकाळी अनेक मार्गावर पाणी वाढल्याने येणारे दूध संकलन ही होऊ शकलेले नाही. आज सकाळी गोकुळ दूध संघ केवळ दोन लाख लिटर इतकेच दूध संकलन करू शकला आहे. तर दहा ते अकरा लाख लिटर दूध संकलन आज होऊ शकलेले नाही. त्यामुळे गोकुळ दूध संघ उद्यापासून दूध संकलन बंद ठेवू शकते, अशी माहितीही पाटील यांनी दिली. दरम्यान, गोकुळ दूध संघाची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या पुणे आणि मुंबई शहरालादेखील गोकुळ दूध संघ दूधपुरवठा करू शकणार नाही, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.