कोल्हापूर - गोकुळ दूध संघ येत्या काही दिवसात ऑक्सिजन प्लांट उभा करणार असल्याची घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. आज नूतन संचालक यांची बैठक कसबा बावड्यातील मेडिकल कॉलेज येथे पार पडली. या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली आहे.
गोकुळ दूध संघाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी संघटनेच्या नूतन संचालकांची बैठक आज पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी गोकुळच्या सर्वच नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीत नूतन संचालकांना आघाडीच्या नेत्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या.
हेही वाचा - अकलूज येथे रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार
गोकुळ हा सर्व सामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांचा संघ आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना कोणतीच अडचण येऊ नये यासाठी संचालक मोठी जबाबदारी आहे. किमान दोन संचालक गोकुळच्या कार्यालयात रोज असायला हवेत या पद्धतीने संचालकांनी कामाला लागावे, दूध उत्पादकाला थेट संचालकांना भेटता येईल, त्यांच्या समस्या सोडवता येईल, या दृष्टीने प्रयत्न करा. असे पालकमंत्री यांनी सांगितले.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना दोन रुपये दूध दरवाढ देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून येत्या दोन महिन्याच्या कालावधीत यावर अभ्यास करून आश्वासने पूर्ण केली जातील, असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
१४ मे रोजी होणार अध्यक्ष निवड
4 मे रोजी निवडणूक प्रक्रियेची मतमोजणी पार पडल्यानंतर राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे पॅनल गोकुळ दूध संघावर निवडून आले आहे. गोकुळ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे. मात्र अध्यक्षपदाची निवडणूक 14 मे रोजी होणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
हेही वाचा - आत्महत्येतही महाराष्ट्र अव्वल! 2019 मध्ये 18,916 जणांनी संपविले जीवन!