हैदराबाद - मकर संक्रांती दिवशी अनेक जण पतंग उडवताना पाहायला मिळतात. वर्षानुवर्षे ही परंपरा सुरू आहे. मात्र बाजारात जेव्हापासून चायनीज मांजा (धागा) दाखल झाला तेंव्हापासून अनेक दुर्घटना घडायला सुरुवात झाली. देशभरात या प्राणघातक चायनीज नायलॉन मांजामुळे आजपर्यंत अनेक पशु पक्षांसह नागरिकांनीही प्राण गमावल्याच्या घटना घडल्या आहेत. राज्यात सुद्धा अशा घटना घडताना पाहायला मिळतात. येथील काही व्यापारी चायनीज मांजा अजिबातच विक्री करत नाही आणि करू देणार नसल्याचे म्हणत असले तर काहीजण मात्र बंदी असूनही दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालत आहेत. पाहुयात यावरचा राज्यातील ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी घेतलेला विशेष रिपोर्ट...
कोणाला इजा पोहोचणार नाही याचंही भान हवे -
कोल्हापूर - कोल्हापुरात दोन वर्षांपूर्वी मांजामुळे एका मुलाला आपला जीव गमवावा लागला होता तर एका तरुणीच्या डोळ्याला तसेच चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात इजा पोहोचल्याची घटना सुद्धा ताजी आहे. एवढेच नाही तर पक्षांना या मांजाचा सर्वाधिक धोका असून वर्षभरात जिल्ह्यात 100 हुन अधिक घटना घडल्या आहेत. त्यामुळे उत्सव जरूर साजरा करावा पण आपल्यामुळे कोणाला इजा पोहोचणार नाही याचंही भान हवे असेही पक्षीमित्र तसेच काही पतंग विक्रेते सुद्धा करतात. चायनीज मांजामुळे सतत अपघात होत असतात. यामध्ये पक्षांचे सर्वाधिक होतात. सध्या पूर्वीच्या तुलनेत याचे काही प्रमाणात प्रमाण कमी आहे. मात्र अनेक वेळा पक्षीमित्र तसेच महापालिका अग्निशमन दलाच्या जवनांकडून रेस्क्यू केल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे नागरिकांनी सुद्धा कॉटनचा धागा पतंग उडविण्यासाठी वापरावा असे आवाहन वर्ल्ड फॉर नेचरचे अभिजित वाघमोडे यांनी केले आहे.
नायलॉन मांजामुळे पक्षी जखमी होण्याचे प्रमाण वाढले -
पिंपरी-चिंचवड : मकरसंक्रांतिच्या निमित्ताने अबालवृद्ध पतंगबाजीचा आनंद घेताना दिसतात. पतंग उंच जावा आणि त्याची दोरी कट होऊ नये म्हणून नायलॉन मांजाचा सर्रास वापर केला जातो. परंतु, हाच मांजा दरवर्षी शेकडो पक्षांच्या जीवावर उठल्याच पाहायला मिळत आहे. वर्ल्ड फॉर नेचर या संस्थेच्या म्हणण्यानुसार दरवर्षी 80 पेक्षा अधिक पक्षी हे गंभीररीत्या जखमी होतात. तर, अनेकांचा मृत्यू होतो. अशी माहिती वर्ल्ड फॉर नेचर या संस्थेचे अध्यक्ष शुभम पांडे यांनी दिली आहे. त्यामुळं नायलॉन मांजाविषयी जनजागृती होणं गरजेचं आहे. मकर संक्रांतीच्या दरम्यान, दरवर्षी 20- 30 पक्षांचा मांजामध्ये अडकून मृत्यू होतो. पोपट, वटवाघोळ, कोकीळ, घुबड, बगळा, कबुतर, घार हे पक्षी मांज्यात अडकून गंभीर जखमी होतात. त्यांचा आकडा दरवर्षी हा 70- 80 असल्याचा वर्ल्ड फॉर नेचर संस्थेचे अध्यक्ष शुभम पांडे यांनी सांगितले आहे. या नायलॉन मांजामुळे अनेक पक्षांना अपंगत्व आलेलं आहे. त्यामुळं नायलॉन मांजा न वापरण्याच आवाहन पांडे यांनी केलं आहे.
मागील वर्षी शहरात 35 पक्षी झाली जखमी -
औरंगाबाद - पतंग उडवताना खबरदारी घ्या असे आवाहन प्रशासनातर्फे तसेच सामाजिक संघटनांतर्फे केले जातं. मात्र पतंग उडवताना एकमेकांची पतंग काटण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धारदार मांजाचे दुष्परिणाम गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात दिसून आले आहेत. 2021 यावर्षी मांजामुळे औरंगाबाद शहरात जवळपास 35 पक्षी जखमी झाल्याची माहिती पक्षीमित्र डॉ किशोर पाठक आणि नितेश जाधव यांनी दिली. या पक्षांवर पक्षीमित्रांनी उपचार केले आहेत. समोर आलेल्या घटना 35 असल्या तरी देखील समोर न आलेल्या घटना देखील मोठ्या प्रमाणात असू शकतात याची शक्यता नाकारता येत नाही. तर मांजामुळे जवळपास आठ नागरिकांना दुखापत झाल्याचं समोर आला आहे असे देखील पक्षिमित्र नितेश जाधव यांनी सांगितलं.
पतंगउत्सवात अनेकांच्या जीवावर 'संक्रांत' -
नागपूर - नागपूरात होणारी पतंग विक्री केवळ नागपूर साठीच नाही तर लगतच्या जिल्ह्यात मोठया प्रमाणात होलसेलमध्ये माल विक्रीची बाजारपेठ आहे. यात बंदी असलेल्या नायलॉन मांजा छुप्या पद्धतीने विकला जातो. नागपूरचे किंग कोब्रा ऑर्गनायझेशनच्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यात मागील पंधरा वर्षात जवळपास 10 हजार नागरीक छोट्या पासून मोठ्या घटनांमध्ये जखमी झालेले आहे. तर 30 हजारा पेक्षा अधिक पशु पक्षी, मुके जनावर श्वान हे सुद्धा जखमी झाले. पंधरा वर्षात काम करताना त्यांच्याकडे जिल्ह्यातील उपलब्ध आकडेवारी नुसार 70 ते 80 जणांना अपंगत्व आल्याची माहिती किंग कोब्रा ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अरविंद रतोडी यांनी ईटीव्ही भारताशी बोलताना दिली. मागील महिन्यात समोर आलेल्या दोन घटनांमध्ये शिक्षक राजेश क्षीरसागर आणि शिक्षक समीर अहमद शेख यांचा गळा चिरला असून थोडक्यात जीव वाचला आहे. यावर्षी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या प्रयत्नानातून तसेच पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनीही बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा विरोधात राबविलेल्या मोहिमेत लाखो रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे.
हेही वाचा - मकरसंक्रांती विशेष राशीभविष्य : सुर्याचा मकर राशीत प्रवेश; जाणून घ्या कोणत्या राशीसाठी असेल लाभदायक