कोल्हापूर - कुरकुरे आणि चिप्स खाऊन पाणबदकांचा मृत्यू झाल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. रंकाळा तलाव परिसरातील पाणबदकांचा मृत्यू झाल्याने परिसरात बर्ड फ्ल्यूची भिती व्यक्त केली जात होती. मात्र पुण्यातील रोग अन्वेषण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार या पणबदकांचा मृत्यू चक्क चिप्स आणि कुरकुरे खाऊन झाल्याचे समजले आहे. दरम्यान, बर्ड फ्ल्यूबाबतचे निदान सुद्धा नकारार्थी आल्याने कोल्हापूरसाठी दिलासादायक बाब म्हटली जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी मृत पक्षी आढळले -
रंकाळा तलावासोबतच कोल्हापूरमधील सरनाईक कॉलनी येथे मृत कबुतर आढळले, त्याचबरोबर गडहिंग्लज येथे 2 मृत कावळे, चंदगड तालुक्यात 1 मृत कावळा आढळून आला होता. त्यामुळे कोल्हापूरात सुद्धा बर्ड फ्ल्यूची साथ आल्याची भीती येथील स्थानिकांनी व्यक्त केली होती. नागरिकांनी याबाबत संबंधित विभागाला माहिती दिल्यानंतर मृत पक्षांचे नमुने पुण्यातील विभागीय रोग अन्वेषण विभागाकडे पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर बर्ड फ्ल्यूचा अहवाल निगेटिव्ह जरी आला असला तरी धक्कादायक माहिती मात्र समोर आली आहे. यातील रंकाळा तलावातील पानबदकांचा मृत्यू चक्क चिप्स आणि कुरकुरे खाऊन झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
रंकाळा तलावात कुरकुरे आणि चिप्स टाकणे धोकादायक -
रंकाळा तलावातील या पानबदकांचा मृत्यू चिप्स आणि कुरकुरे खाल्ल्याने झाल्याची बाब समोर येताच पक्षांच्या सुरक्षेबाबतचा सुद्धा एक नवीन मुद्दा समोर आला आहे. त्यामुळे रंकाळ्यावरती फिरायला येणाऱ्या नागरिकांनी सुद्धा या गोष्टीची दखल घेत कुरकुरे आणि चिप्स किती धोकादायक ठरू शकतात हे समजून घेण्याची गरज आहे. अन्यथा आणखीन काही पक्षी दगावण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, यापूर्वी सुद्धा अनेक वेळा रंकाळा तलावात पानबदकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.