कोल्हापूर : कोल्हापूरात शेतीला जोड व्यवसाय म्हणून सर्वजण दूध उत्पादन व्यवसाय करतात. जिल्ह्यात प्रत्येकाच्या घरात सर्रास जनावरं पाहायला मिळतात. आपल्या जनावरांची कुटुंबातील एखाद्या सदस्यांप्रमाणेच ते काळजी घेत असतात. कोल्हापूरातल्या हुपरीमध्ये (Cow Baby Shower) सुद्धा याचीच प्रचिती आली आहे. कारण इथल्या शेतकरी कुटुंबाने गाईच्या डोहाळे जेवणाचाच कार्यक्रम ठेवला होता आणि या कार्यक्रमाला एक दोन नाही तर तब्बल 400 ते 500 लोकांचे जेवण सुद्धा बनवले होते. पाहुयात यावरचा खास रिपोर्ट...
जनावरांची आवड असणारे माने कुटुंबीयकोल्हापूरातल्या हातकणंगले तालुक्यातील हुपरी गावातील अरुण आप्पासाहेब माने यांच्या घरी गेल्या अनेक वर्षांपासून जनावरं आहेत. जनावरांचे त्यांच्या कुटुंबात एक वेगळं स्थान आहे. यावेळी त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या खिलार जातीच्या चार वर्षाच्या राधा गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करायचे ठरवले. त्यानुसार डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू झाली. घरासमोर मोठा मंडप घालण्यात आला. जवळपास 400 ते 500 पाहुण्यांना निमंत्रणही देण्यात आली. अगदी महिलांच्या डोहाळे जेवणाचा ज्या उत्साहात कार्यक्रम असतो अगदी तसाच कार्यक्रम साजरा झाला. दरम्यान, माने कुटुंबियांच्या राधा नावाच्या साजरा केलेल्या राधा गायीच्या डोहाळे जेवणाचा साजरा केला.
गायीलाही सजवले; गावातल्या महिलांची हजेरी
दरम्यान, डोहाळे जेवणाच्या निमित्ताने माने कुटुंबीयांनी गायीला सजविले होते. गळ्यात हार आणि दोन्ही शिंगे रंगवून लाल रंगाचे गोंडे लावून तिला सजविण्यात आले. शिवाय नव्या कोऱ्या हिरव्यागार सहा वार साडीने गायीच्या ओटीभरणीही करण्यात आली. या कार्यक्रमाला पाहुण्यांसह गावातल्या बहुतांश महिलांनी सुद्धा हजेरी लावली होती.
गायी म्हशींचे डोहाळजेवण जिल्ह्यात यापूर्वी सुद्धा अशाच पद्धतीने डोहाळे जेवणाचे कार्यक्रम पार पडल्याच्या घटना झाल्या आहेत. याद्वारे गाई म्हैस यांच्याबद्दल असलेले प्रेम आणि जिव्हाळा यातून स्पष्ट होतो. दरम्यान, हुपरीतील माने कुटुंबियांनी साजरा केलेल्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.