कोल्हापूर - शहरातील रंकाळा टॉवर परिसरामध्ये एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिका हद्दीमध्ये आजपर्यंतच्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 22 वर पोहोचली आहे.
रंकाळा परिसरात नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर नागरिक रंकाळ्यावर येत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी हा रुग्ण सापडला आहे, त्या रंकाळा टॉवर ते महाराष्ट्र सेवा मंडळ दरम्यानचा मुख्य रस्ता आणि त्याला जोडणारे इतर रस्ते सीमाबंद करून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. करवीर उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी वैभव नावडकर यांनी हे आदेश दिले आहेत.
दरम्यान, त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची माहिती घेऊन त्यांचे सुद्धा स्वॅब घेण्यात येत आहेत. सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता, त्यावर तत्काळ नियंत्रण करणे व कोराना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. त्यानुसार कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता या विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीस त्याच्या संपर्कात आल्याने होते. त्यामुळे याची तत्काळ काळजी घेत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील रंकाळा टॉवर ते महाराष्ट्र सेवा मंडळ दरम्यानचा मुख्य रस्ता आणि त्याला जोडणारे इतर रस्ते उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी करवीर उपविभाग कोल्हापूर यांच्या आदेशाने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून या क्षेत्राच्या रस्त्यांच्या सीमा सीलबंद करण्यात आल्या आहेत.