कोल्हापूर - सांगलीहुन निघालेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ट्रॅक्टर रॅली तब्बल 8 तासानंतर कोल्हापूरात दाखल झाली. या रॅलीमध्ये शेकडो शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते. तब्बल 8 तासांहून अधिक वेळ या आंदोलकांमध्ये मोठ्या प्रमाणात जोश आणि केंद्र सरकारविरोधात चीड पाहायला मिळाली. दरम्यान, आजच्या ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून सरकारला केवळ इशारा आहे, वेळ पडल्यास हीच रॅली दिल्लीकडे कूच करेल असा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.
दिल्लीमधील आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केल्यास -
उद्या देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. दिल्लीमध्ये सैनिक संचलन करणार आहेत. दुसरीकडे बळीराजा आपल्या हक्कांसाठी ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून संचलन करत आहे. केवळ 4-5 राज्यांचे हे आंदोलन नसून संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांचे हे आंदोलन आहे हे आज देशभरात शेतकऱ्यांनी काढलेल्या विविध मोर्चामुळे दिसुन आले आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हंटले आहे. शिवाय हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केल्यास सरकारला खूप मोठ्या परिणामांना सामोरे जावे लागेल. वेळ पडल्यास हेच शेतकरी दिल्ली येथील शेतकऱ्यांना पाठिंबा द्यायला दिल्लीकडे आपले ट्रॅक्टर घेऊन कूच करतील असा इशारा सुद्धा शेट्टी यांनी दिला आहे.
हजारो शेतकरी; मोठा उत्साह -
नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात उद्या पार पडणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सांगलीतील विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात झाली होती. मोर्चा जस-जसा कोल्हापूरच्या दिशेने यायला लागला तस-तसे हजारो शेतकरी या आंदोलनात आपले ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. शेतकऱ्यांमध्ये सुद्धा मोठा उत्साह पाहायला मिळत होता. शिवाय कृषी कायद्यांच्या विरोधात संताप सुद्धा व्यक्त करताना पाहायला मिळाले. मोर्चाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद इतका मोठा होता परिणामी सांगलीतून निघालेला मोर्चा तब्बल 8 तासांनंतर कोल्हापूरात पोहोचला.