कोल्हापूर - खासदार संभाजीराजे यांनी ध्यानात ठेवले पाहिजे, आंदोलनात चालढकल चालत नाही. केली तर ते समजण्याइतका मराठा समाज सूज्ञ आहे, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.
तुमची नेमकी भूमिका काय असणार - चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, की खासदार संभाजीराजेंनी रायगडावरून आधी मोर्चा काढतो म्हटले, त्याच्या दुसऱ्या मिनिटाला भाजपने तुमचे नेतृत्व मान्य केले. अगोदर तुम्ही मोर्चा काढतो म्हणता, आता आमदार-खासदारांना जाब विचारणार म्हणता. त्यानंतर पुन्हा पुण्यातून मुंबईला लाँग मार्च काढणार म्हणता. अगोदर तुमची नेमकी भूमिका काय असणार हे समाजासमोर मांडले पाहिजे. सरकारला वाचवण्यासाठी आपण मदत करणार आहात का? या सर्व गोष्टीचा विचार केला तर संभाजीराजेंनी ध्यानात ठेवले पाहिजे, आंदोलनात चालढकल केली तर ते समजण्याइतका मराठा समाज सूज्ञ आहे, असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
आकडे लपवून स्वतःची पाठ थोपटून घेता का? - चंद्रकांत पाटील
राज्यात मृत्यूचे प्रमाण लांबचा विषय आहे. देशातील तीन लाख मृत्यू पैकी एक लाख मृत्यू हे राज्यातील आहेत. देशातील तीस टक्के लोक कोरोनाने मृत्यू होणे हे गंभीर आहे. लपवलेले 11 हजार मृत्यू यात जोडले तर हा आकडा मोठा होऊ शकतो. आकडे लपवून स्वतःची पाठ थोपटून घेता का? असा सवाल राज्य सरकारला चंद्रकांत पाटील यांनी केला. राज्याची अशी अवस्था का झाली? आपण कुठे कमी पडलो याचा राज्य सरकारने अभ्यास केला पाहिजे. 11 हजार मृत्यू का लपवले याची माहिती जनतेला दिली पाहिजे. राज्य सरकारने पहिल्या व दुसऱ्या लाटेकडे दुर्लक्ष केले. पुणे आणि मुंबई महापालिकेने कोरणा नियंत्रणावर खर्च केला मग राज्य सरकारने कोरोना नियंत्रण करण्यासाठी काय केले? याची श्वेतपत्रिका काढून जाहीर करावे. राज्य सरकारने तिसऱ्या आणि तिसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी अपेक्षा चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
वारीसाठी कोविडचे नियम पाळून परवानगी मिळाली पाहिजे - चंद्रकांत पाटील
वारकरी संप्रदाय हा धर्म, संस्कृती आणि संघटन मानणारा आहे. मग राज्य सरकार अशा गोष्टींना विरोध का करत आहे? वारकऱ्यांना आषाढी वारीसाठी कोविडचे नियम पाळून परवानगी मिळाली पाहिजे अशी अपेक्षा चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.