कोल्हापूर - भारतीय जनता पक्ष सर्वांना पुरून उरला आहे. जो समर्थ असतो त्यालाच जास्त शत्रू असतात. त्यामुळे त्यांचा थयथयाट होणे स्वाभाविक आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या सामनातील मुलाखतीवर दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली. यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीसह संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, की संजय राऊत हे रोज वेगवेगळी विधान करून उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणतात. पुन्हा तेच संजय राऊत त्यांना पुन्हा का लागतात, हा प्रश्न ठाकरे यांना विचारावा लागणार आहे. सामना म्हणजे संजय राऊत आहेत का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा-'सुडाने वागायचे असेल तर तुम्ही एक सूड काढा, आम्ही दहा सूड काढू'
कोणाचे हिंदुत्व बेगडी आणि कोणाचे दलालाचे हे जनतेला विचारा-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजपचे हिंदुत्व दलालांचे आहे, अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा जोरदार प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ज्या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली तेव्हापासून या देशात हिंदुत्वाचे रक्षण झाले. हे सर्वसामान्य नागरिकांना माहिती आहे. संघाने हिंदूंना संघटित केल्यामुळेच हिंदुत्वाचे रक्षण झाले आहे. जातीय हिंसाचार थांबला. त्यामुळे कोणाचे हिंदुत्व बेगडी आणि कोणाचे दलालांचे हे सर्वसामान्य जनतेला जाऊन विचारा, असे प्रत्युत्तरही चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिले.
हेही वाचा-'हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे का...'
शिवसेना पक्षप्रमुखांची भाजपवर सडकून टीका-
राज्यपालांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित हिंदुत्वावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. तसेच भाजपा आणि राज्यपाल दोघेही 'शिवसेनेने हिंदुत्व सोडले', असा आरोप करत होते. याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी या मुलाखतीतून दिले. ते म्हणाले, हिंदुत्व सोडायला ते काही धोतर आहे का? हिंदुत्व अंगामध्ये, धमन्यांमध्ये असावे लागते. धमन्यांमध्ये भिनलेली गोष्ट आपण सोडू शकत नाही, असेही ते म्हणाले. हिंदुत्व म्हणजे फक्त पूजाअर्चा करणं आणि घंटा बडवणं आहे का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. तसेच, त्याने कोरोना जात नाही हे सिद्ध झालंय, अस टोलाही त्यांनी लगावला. कोणत्याही धर्माच्या आडून राजकारण करू नका आणि आम्हाला हिंदुत्व शिकवायच्या भानगडीत पडू नका, असे मुख्यमंत्र्यांनी भाजपला सामनातील मुलाखतीत सुनावले.