कोल्हापूर - राज्यातील महाविकास आघाडी सरकारने भक्कम पणे बाजू न मांडल्या मुळेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा मुद्दा फेटाळून लावला आहे. महाविकास आघाडी सरकारचा हा द्रोह असून मराठा समाजाचा विश्वासघात केला आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केली आहे.
सुप्रीम कोर्टाने आज मराठा आरक्षण रद्द केल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. त्यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत संवाद साधला. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवला आहे. आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली जात असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरविले आहे. मराठा समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचा गायकवाड आयोगाचा निष्कर्षही चुकीचा असल्याचे निरीक्षण पाच न्यायमूर्तींच्या पीठाने निकालात नोंदवला आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर राज्य सरकार आपली बाजू मांडण्यास सक्षम नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय योग्यपणे बाजू मांडत उच्च न्यायालयात हा कायदा संमत करून घेतला होता. मात्र, महा विकास आघाडी सत्तेत आल्यापासून या प्रश्नाकडे कधीच गांभीर्याने पाहिले नाही. या सरकारला मराठा समाजाची बाजू मांडता आलेली नाही. सरकारमध्येच सुसंवाद नसल्यामुळे आणि सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाला हा मोठा फटका बसला असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने कोरोना आणि आरक्षण प्रश्नावर अधिवेशन बोलावण्यात यावे अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली.