कोल्हापूर - महाविकासआघाडी सरकारला कायदा आणि सुव्यवस्था पेक्षा कॉन्ट्रॅक्ट, टेंडर आणि पैसा महत्त्वाचा आहे. राज्यात कायद्याचा धाक राहिलेला नाही. लगेच जामीन मिळतो. खटला खूप वर्षे चालतो. त्यामुळे अशा प्रकारात वाढ झाली आहे. राज्य सरकारने हे सर्व खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले पाहिजेत. तो कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता आहे हे पाहण्यापेक्षा महाविकास आघाडी सरकारने तपासात हस्तक्षेप न करता पीडितांना न्याय मिळवून दिला पाहिजे. मुंबई साकीनाका प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी. अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. आज (शनिवार) ते साकीनाका प्रकरणावरून पत्रकार परिषदेत बोलत होते.
'गेल्या चार दिवसातील ही सहावी घटना'
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, साकीनाका परिसरात घडलेली घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. या प्रकरणावरून समाज हादरून गेला आहे. यामध्ये दोषी असणाऱ्या व्यक्तींना कडक शिक्षा झाली पाहिजे. त्याशिवाय धाक निर्माण होणार नाही. गेल्या चार दिवसातील ही सहावी घटना आहे. महिलांवर अत्याचार होत असताना कारवाई होत नसल्याने अशा घटना मधील सराईतपणा वाढला आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
'पोलिसांवर राजकीय दबाव'
राज्यात कायद्याचा धाक राहिलेला नाही. पटापट जामीन होत आहेत. हे खटले वर्षभर चालत आहेत. जर हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले तर दोषींना लवकर शिक्षा मिळेल. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात कायद्याचा धाक निर्माण झाला होता. पोलिसांवर राजकीय दबाव असेल तर काय होणार नाही असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.
'काँग्रेसला अनपेक्षितपणे सत्ता मिळाली'
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसवर बोलल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस पक्षाला शरद पवार काहीही म्हणाले तरी काँग्रेस बाहेर पडणार नाही. कारण काँग्रेसला अनपेक्षितपणे सत्ता मिळाली आहे. काँग्रेस आता पक्ष राहिलेला नाही. यातील बहुतेक जण सत्ता मिळते ना मग सहन करा, अशाच मानसिकतेत आहेत. असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
'तुमच्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही'
छगन भुजबळ यांच्या बद्दल बोलताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला पाप फेडावे लागेल. अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी जलसंपदा मंत्री यांचा समाचार घेतला. जर या प्रकरणात सर्व दोषी ठरत असतील तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटीची संपत्ती जप्त करण्याची वेळ का आली? याचे उत्तर त्यांनी द्यावी. जयंत पाटील तुम्ही धमक्या देऊ नका ! तुमच्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. असे प्रतिउत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा - Mumbai Nirbhaya Case : घटना निंदनीय, फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश