कोल्हापूर - मागास आयोग खोटा असल्याचे एका मंत्र्यांने वक्तव्य केले आहे. मागास आयोग हा घटनेच्या चौकटीतला आहे. त्यांनी केलेला अहवाल विधानसभा तसेच विधानपरिषदेने सुद्धा स्वीकारला आहे. त्यानुसार कायदा झाला आहे. असे असताना हा आयोगच खोटा असल्याचे वक्तव्य म्हणजे समाजाला हुसकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या मंत्र्यावर तात्काळ कारवाई करून त्यांनी स्वतः राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. कोल्हापुरातील दसरा चौक येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते आले असता पत्रकारांशी बोलत होते.
सरकार मराठा आरक्षणाबद्दल गंभीर नाही -
सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल गंभीर नाहीच पण वेगवेगळ्या सवलती देणे जे त्यांच्या हातामध्ये आहे त्यामध्ये सुद्धा सरकार पूर्णपणे निष्काळजीपणा दाखवत आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळच्या माध्यमातून दहा लाखांपर्यंत कर्ज बिनव्याजी दिले जात होते ते सुद्धा बंद केले. सारथीच्या बाबतीतही तेच त्यामुळे जे हातात आहे ते सुद्धा त्यांना द्यायला जमत नाही आहे. म्हणूनच भाजप त्यांचा निषेध व्यक्त करत असल्याचेही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
पूर्वकल्पना देऊनही मुंबईत आंदोलन -
राज्यपालांनी दोन दिवस आधीच मी गोव्यामध्ये जाणार असल्याचे सांगितलं होते. गोवा राज्याचा सुद्धा त्यांच्याकडे अतिरिक्त भार आहे. त्यामुळे त्यांना तिकडे जावेच लागत होते तसे त्यांनी आंदोलकांना कळवले होते. मात्र, त्यांच्यावर आरोप होत आहेत हे चुकीचे आहे. मी राज्यपालांचा पीआरओ नाही. मात्र, राज्यपालांच्या कार्यालयांमधून याबाबत सविस्तर पत्रक काढण्यात आले आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले.