कोल्हापूर - कोल्हापूर, सांगली व बेळगांव जिल्ह्याच्या महापुरास कारणीभूत असणाऱ्या अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. शेट्टी यांनी याबाबत कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंना निवेदन दिले आहे. याशिवाय कृष्णा, दुधगंगा, वेदगंगा आणि हिरण्यकेशी नद्यावरील पुलाचा भराव कमी करून कमानी बांधण्याचे शेट्टी यांनी बोम्मई यांना सांगितले आहे.
नद्याला आलेला भराव कमी करण्याची गरज
सीमाभागामध्ये महापुराने थैमान घातले असून महापुराचे पाणीपातळी कमी होण्यास वेळ लागणार आहे. नागरी वस्तीत व शिवारात जास्त दिवस पाणी राहिल्याने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 2005 , 2006, 2019 व 2021 या महापुराचा विचार करता 2021च्या महापुरात कोल्हापूर, सांगली आणि बेळगांव जिल्ह्यातील महापुराची परिस्थिती बदलल्याचे जाणवले आहे. कृष्णा, दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी नद्यांवर पूल बांधले आहेत. त्या अनेक पुलाच्या दोन्ही बाजूस दोन - दोन किलोमीटर भराव आहे. महापूर काळामध्ये नदयापांसून दोन - दोन किलोमीटर पाणी पसरते. अशा काळात हे पूल बंधाऱ्याचे काम करतात. त्यामुळे नदीतील पाण्याची पातळी कमी होते. महापुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑगस्टपर्यंत अलमट्टीची पाणीपातळी 512 मीटर ठेवावी. कृष्णा, दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी नद्यावरील पुलांचा भराव कमी करावा. आणि दोन्ही बाजूस दोन -दोन कमानी बांधल्यास पाण्याचा फुगवटा कमी होईल. आणि पात्राबाहेर पडलेले पाणी सहजगत्या प्रवाहीत होईल, असेही शेट्टी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कमानीची उभारणी करू
कृष्णा नदीवर महाराष्ट्र हद्दीपासून ते हिप्परगी धरणापर्यंत मोठे 6 पूल , हिरण्यकेशी नदीवर महामार्गावरील 5 पूल आणि दुधगंगा -वेदगंगा नदीवरील पूलांचे भराव महापुरास कारणीभूत ठरत आहेत. चिकोडी तालुक्यांतील अंकली -मांजरी पुलाच्या भरावामुळे शिरोळ, हातकंणगले, चिकोडी तसेच निपाणी तालुक्यांतील पूरस्थिती गंभीर होत आहे. यामुळे कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणांची उंची न वाढविता कृष्णा, दुधगंगा , वेदगंगा व हिरण्यकेशी नद्यावरील पुलाचा भराव करावा. यावेळी मुख्यमंत्री बोम्मई यांनी महापुराच्या समस्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून पुलांचे भराव कमी करून कमानी उभारणी करून पाणी प्रवाहित केले जाईल. तसेच महापुर नियंत्रणासाठी अभ्यासगट नेमावे. त्याबाबत उपाययोजना करत असून कर्नाटक सरकारकडून केंद्रीय जल आयोगाकडेही पत्रव्यवहार केल्याचे सांगितले आहे. तसेच उपाययोजनांसाठी लवकरच मंत्रालयात बैठकीसाठी शेतकरी प्रतिनिधी म्हणून राजू शेट्टी यांना या बैठकीसाठी निमंत्रित केले. यावेळी कर्नाटक राज्य व केंद्र सरकारचे समन्वयक मंत्री शंकरगौंडा, खासदार आण्णासाहेब ज्वोले, मा. आमदार संजय पाटील, मा. आमदार कल्लाप्पाणा मग्यान्नावर, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्यान्नावर आणि बेळगांव जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - आरती साहूचा 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल, बजरंग दलाने केली कारवाईची मागणी