कोल्हापूर - राधानगरी तालुक्यातील पाटीलवाडी गावाच्या शिवारात तरुणांनी विनापरवाना क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले. यावेळी या तरुणांनी चिअर गर्ल्स आणून धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. चिअर गर्ल्ससोबत तरुण बेधुंदपणे थिरकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हजारो तरुण सकाळपासूनच कामधंदा सोडून पाटीलवाडी शिवारात हजर झाले होते. पोलीस येण्याच्या भीतीने आयोजकांनी स्पर्धा रद्द करून धूम ठोकली. मात्र, तरुणांनी घातलेल्या धिंगाण्याची कोल्हापुरात जोरदार चर्चा सुरू आहे.
मुलाच्या वाढदिवसासाठी भरवली क्रिकेट स्पर्धा
मुलाच्या वाढदिवसांनिमित्त क्रिकेट स्पर्धा भरवून त्यात विनापरवाना चिअर गर्ल्स नाचवणे एका बापाला चांगलेच महागात पडले आहे. हा प्रकार राधानगरी तालुक्यातील गवसे पैकी पाटीलवाडीत घडलाय. याप्रकरणी भैरवनाथ रघुनाथ पाटील आणि त्याचे वडील रघुनाथ दिनकर पाटील या दोघांवर राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
रघुनाथ पाटील यांनी मुलाच्या वाढदिवसानिमित्त पाटीलवाडी गावात विनापरवाना क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. मुलाला खुश करण्याच्या उद्देशाने ‘चिअर गर्ल्स’ आणल्या होत्या. त्यांना पाहण्यासाठी तरुणांची मोठी गर्दी लोटली होती. सामने सुरू असतानाच साउंड सिस्टीमच्या तालावर ‘चिअर गर्ल्स’नी ताल धरला. यात उपस्थित तरुणांनीही सामील झाले. सुमारे चार तास हा प्रकार सुरू होता. या गोष्टीची कुणकुण लागताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच उपस्थित तरुण, चिअर्स गर्ल्स, बर्थ-डे बॉय आणि त्याच्या वडिलांनी पळ काढला. याप्रकरणी भैरवनाथ पाटील आणि त्याचे वडील रघुनाथ दिनकर पाटील या दोघांवर राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती शाहूवाडीचे पोलीस उपअधीक्षक अनिल कदम यांनी दिली.