कोल्हापूर - भारतीय जनता पार्टीने मला टार्गेट करण्याचे काम सुरू केले आहे. सातत्याने मी त्यांच्या विरोधात आवाज उठवतो. त्यामुळेच मला टार्गेट केले जात आहे. आता माझ्या कुटुंबीयांना बदनाम करण्याचे कारस्थान भारतीय जनता पार्टी करत आहे, असा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, आमचे नेते शरद पवार आणि राष्ट्रवादीविरोधात भारतीय जनता पार्टीचे नेते बोलले, तर मी त्यांच्या विरोधात आवाज उठवत होतो. हा आवाज दाबण्यासाठी भारतीय जनता पार्टी मला टार्गेट करत आहे. आता भाजपने माझ्या कुटुंबीयांना बदनाम करायचे कारस्थान सुरू केले आहे. माझ्या जावयाला बदनाम करण्यात येत आहे. या नवीन कारस्थानाचा मी निषेध करतो. कोणीही कोणाकडेही तक्रार करू दे, जे व्हायचं ते होऊन जाईल, अशा पद्धतीची प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
हे ही वाटा - शोधून शोधून दमले, पण परमबीर सिंग सापडेना - जयंत पाटील
जिल्हा परिषद मधील आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द झाल्या. त्यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, आरोग्य विभागातील परीक्षांसाठी ज्या आयटी कंपनीची निवड करण्यात आली होती. ती निवड आरोग्य विभागाने केली होती. ग्राम विकास विभागाने त्या कंपनीची निवड केली नाही. या संदर्भात वाद झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्या कंपनीची फेरतपासणी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा - ...म्हणून वडिलांनी स्वत:च्या 5 वर्षांच्या मुलाला फेकले पंचगंगा नदीत; कोल्हापूरच्या कबनूरमधील घटना
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना मी संयम राखण्याची विनंती केली आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेती सुद्धा आता बेचिराख झाली आहे. जोपर्यंत पंचनामे पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत राज्य सरकार यावर काही करू शकणार नाही. सर्वांनी थोडा संयम राखला पाहिजे. अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.