कोल्हापूर - राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळाली नसती तरी त्यांची सभा झालीच असती. शिवाय आता परवानगी मिळाली आहे. त्यामुळे राज्यातले अनेक नागरिक राज ठाकरे यांची सभा ऐकतील, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. शिवाय राज ठाकरे यांचे अस्तित्व धोक्यात येईल, असे बाळासाहेब थोरात म्हणत आहेत. त्यांनी आधी स्वतःच्या अस्तित्वाची चिंता करावी, राज ठाकरे यांची चिंता नसावी. राज ठाकरे हे स्वतःच्या अस्तित्वाची चिंता करायला स्वतः समर्थ आहेत, असेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मनसेसोबत युतीबाबतचा कोणताही प्रस्ताव अद्याप नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजद्रोहाच्या गुन्ह्यावरून बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालीसा म्हणण्याचा संकल्प हा राजद्रोह कसा होऊ शकतो? राजद्रोह आणि देशद्रोह गुन्हा कशाही वेळी लावला जात आहे. त्यामुळे सर्वच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी बसून हे संपवले पाहिजे, असे सुद्धा चंद्रकांत पाटील म्हणाले.
'विविध प्रश्नांसाठी भाजपा रस्त्यावर उतरले' : दररोज सर्वच पक्षांचे नेते एकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहेत. मात्र सर्वसामान्य नागरिकांना महागाई तसेच विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याकडे कोणाचे लक्ष नाही नागरिकांना दिलासा कसा मिळेल विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही विरोधी पक्षाच्या भूमिकेत राज्यात काम करत आहे. आम्ही आमची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडत आहे. सद्या राज्यात भारनियमन बाबत सुद्धा आवाज उठवला त्यानंतर भारनियमन करण्याचा निर्णय मागे घेतला गेला. अशाच पद्धतीने राज्यातील विविध प्रश्नांसाठी भाजपा रस्त्यावर उतरले असेही ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा - Mumbai AC Local Train : रावसाहेब दानवेंची मोठी घोषणा; एसी लोकलचे 50 टक्के भाडे कमी