कोल्हापूर - बुधवारी आणखी तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. चंदगड तालुक्यातील गवसे गावातल्या एका 30 वर्षीय महिलेसह 11 आणि 6 वर्षीय लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी रात्री उशिरा सीपीआर प्रशासनाला यांचे अहवाल प्राप्त झाले. सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापुरात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गवसे गावातील महिला आपल्या मुलांसह 11 मार्च रोजी मुंबईतील सांताक्रूझमधून कोल्हापुरात दाखल झाली होती. त्यावेळी त्यांचे येथील सीपीआर रुग्णालयात स्वॅब घेण्यात आले होते. बुधवारी रात्री यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोल्हापुरात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 25 वर गेली आहे.
मंगळवारी कोल्हापुरातील शाहूवाडी येथील 2 आणि पन्हाळा तालुक्यातील 1 अशा तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी आणखीन तीन रुग्ण सापडले असल्याने आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आहे. चंदगडमधील या तीन रुग्णांसह कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात आजपर्यंत एकूण 23 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये आतापर्यंत एकूण 9 जणांना डिस्चार्ज दिला आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. सद्या 13 रुग्णांवर कोल्हापुरातल्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, चार दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या संख्येने नागरिक दाखल झाले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढच होत चालली आहे. एकीकडे कोरोनामुक्तीच्या दिशेने चाललेल्या कोल्हापुरात जिल्ह्याबाहेरून आलेल्या नागरिकांमुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. विशेष करून मुंबईहून कोल्हापुरात आलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या तुलनेत जास्त आढळून आली आहे.