कोल्हापूर - जिल्ह्यात आज लॉकडाऊनचा तिसरा दिवस आहे. पण विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर आता पोलिसांनी कडक कारवाईला सुरवात केली आहे. लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवसापर्यंत २ हजार ३८८ दुचाकी जप्त केल्या असून आता उद्यापासून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या चारचाकीदेखील जप्त केल्या जाणार असल्याचा इशारा वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी दिला आहे. तर ५८ लाख इतका दंड वसूल केला आहे.
उत्स्फूर्त प्रतिसाद असला तरी...
कोल्हापुरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. रविवारपासून हा लॉकडाऊन सुरू झाला आहे. याला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असला तरी अजून काही लोक रस्त्यावर वावरताना दिसत आहेत. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली आहे.
चारचाकी वाहनातून पडत आहेत बाहेर
गेल्या दोन दिवसात शहर वाहतूक शाखेने तब्बल 2 हजार 388 दुचाकी जप्त केल्या असून त्या माध्यमातून 58 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. 28 हजार वाहनधारकांवर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आले आहेत. काही जण चारचाकी वाहनातून बाहेर पडत असल्याचे निदर्शनात येत आहे. आता ही वाहनेसुद्धा ताब्यात घेण्याच्या सूचना जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. शैलेश बलकवडे यांनी दिले आहेत. त्यानुसार आता चारचाकी वाहनांवरदेखील कारवाई होणार असल्याची माहिती शहर वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी दिली आहे.